आशा सेविकांचे काम चालू, मानधन बंद..!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST2021-08-28T04:43:42+5:302021-08-28T04:43:42+5:30

कोयनानगर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांचे मासिक मानधन निधीअभावी रखडले, तर वाढीव मानधनही बंद ...

Asha Sevikan's work continues, honorarium stopped ..! ' | आशा सेविकांचे काम चालू, मानधन बंद..!’

आशा सेविकांचे काम चालू, मानधन बंद..!’

कोयनानगर : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांचे मासिक मानधन निधीअभावी रखडले, तर वाढीव मानधनही बंद झाल्याने आशासेविकांचे ‘काम चालू, मानधन बंद..!’ अशी स्थिती झाली आहे.

आशा सेविकांनी विविध मागण्यांसाठी जून महिन्यात पुकारलेल्या राज्यव्यापी संपादरम्यान शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानुसार जुलै महिन्यापासून वाढीव मानधन १५०० रुपये इतर काही मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, दोन महिने होत आले तरी हे वाढीव मानधन मिळालेच नाही. तसेच गेल्या चार महिन्यांपासून प्रतिमहिना २००० मानधनही बंद केल्याने तुटपुंज्या मानधनावर आरोग्य यंत्रणेचा खंबीरपणे डोलारा पेलणारा कणाच आता मानधनाभावी पुरताच खचून गेला आहे. महागाईने वस्तूचे दर गगनाला भिडले असताना घरखर्चासह इतर खर्चाचा मेळ घालायचा कसा, हा प्रश्न आशा सेविकांसमोर उभा ठाकला आहे.

सरकारने कोरोना काळातील आशांच्या कामाची प्रशंसा करून मानधन वाढीने हातभार लावण्याची घोषणा केली होती. दोन महिने झाले तरी वरिष्ठांचा आदेश व निधीचा भार तालुक्यापर्यंत न आल्याने तालुका कार्यालयाचाही हात पोहोचेना. आशा स्वयंसेविकांना सुमारे ७५ प्रकारची विविध कामे असून, ती सुरूच आहेत. हात सुरू अन् मानधन बंद, अशी केविलवाणी अवस्था झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात आशांच्या पदरी पुन्हा निराशा की महागाईमुळे दुर्दशा होणार, हे काही दिवसांतच समजेल.

आरोग्य विभाग व ग्रामस्थांमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या आशांनी आजवरच्या केलेल्या कामाचा चढता आलेख पाहता त्यांना कायम सेवेत सामावून घेणे गरजेचे असतानाही आजही शासन मानधनापासून उपेक्षित ठेवत आहे.

चौकट..

खऱ्याखुऱ्या कोरोना योद्धा..

आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कोरोनाच्या काळात गावा-गावात मोठी जबाबदारी आशांवर पडली होती. डॉक्टर्स, पोलीस, शासकीय यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून काम करत असलेल्या आशा स्वतःचा जीव मुठीत घेऊन आवश्यक साधने व प्रशिक्षण नसतानाही गावातील कोरोना नियंत्रणात ठेवणाऱ्या खऱ्याखुऱ्या कोरोना योद्धा ठरल्या.

Web Title: Asha Sevikan's work continues, honorarium stopped ..! '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.