कऱ्हाडात जाळपोळ; राज्यमार्ग रोखला

By Admin | Updated: August 12, 2014 23:18 IST2014-08-12T22:46:51+5:302014-08-12T23:18:22+5:30

सोळाजणांना अटक : लिंगायत आंदोलनकर्ते संतप्त

Arson in Karhad; Stop the highway | कऱ्हाडात जाळपोळ; राज्यमार्ग रोखला

कऱ्हाडात जाळपोळ; राज्यमार्ग रोखला

कऱ्हाड : ओबीसी आरक्षणासह इतर मागण्यांसाठी येथे सुरू असलेल्या लिंगायत समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी पंढरपूर-गुहागर राज्य मार्गावर टायर पेटवून दिले. शहरातील पेट्रोलपंप चौकात रास्ता रोकोही केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन महिलांसह सोळा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
घटनेनंतरही समाजाचे भेदा चौकातील उपोषण सुरूच आहे. निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी दुपारी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, तर सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.
लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, महाराष्ट्रात लिंंगायत समाजास लोकसंख्येवर आधारित अल्पसंख्याक दर्जा मिळावा व लिंंगायत धर्मास धर्ममान्यता मिळावी, आदी प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या वतीने शहरातील भेदा चौकात चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
आंदोलन अधिक तीव्र होत असतानाच आज सायंकाळी पाचच्या सुमारास समाजाचे काही कार्यकर्ते शहरातील पेट्रोलपंप चौकात जमा झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गुहागर-पंढरपूर राज्यमार्ग अडविला. तसेच रस्त्यावर टायर पेटवून दिले. माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल
झाले. त्यांनी दोन महिलांसह एकूण
सोळा आंदोलकांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर
गुन्हा दाखल करून अटक करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू
होती. (प्रतिनिधी)

फडणवीस आले अन्...
‘भाजप’चे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मंगळवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. तसेच ‘तुम्ही तुमची ताकद दाखवून द्या, आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुमचा विषय नक्की मार्गी लावू,’ असे आश्वासन दिले. त्यानंतर फडणवीस उपोषणस्थळापासून बाहेर पडत असतानाच शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत रस्त्यापर्यंत गेले. तेथून ते तसेच चौकात गेले व जाळपोळीसह रास्ता रोको केला.
चार उपोषणकर्त्यांवर उपचार

रात्री उशिरा उपोषणकर्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुरगाप्पा खुमसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख काका कोयटे, श्रीकांत म्हमाणे व प्रमोद भाले यांची प्रकृती खालावल्यामुळे या तिघांनाही यापूर्वीच उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Arson in Karhad; Stop the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.