बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसाचेही आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:53+5:302021-09-12T04:44:53+5:30
कुडाळ : जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने ओढ दिली. यामुळे खरिपातील पिके ऐन बहराच्या काळात कोमेजू लागली होती. याला ...

बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसाचेही आगमन
कुडाळ : जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाने ओढ दिली. यामुळे खरिपातील पिके ऐन बहराच्या काळात कोमेजू लागली होती. याला पावसाची नितांत गरज होती. यातच गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसाचेही आगमन झाल्याने शेतकरी आनंदित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिके कोमेजू लागली होती. यातच पिकांचा बहराच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा आनंदित झाला आहे.
खरीप हंगामातील भुईमुगाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यांना पावसाची आवश्यकता होती. आता बाप्पांच्या आगमनाबरोबर पावसानेही हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने पिकांच्या शेंगा भरणार असून, हातातोंडाशी आलेले पीक आता चांगले येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन पिकांना मात्र ऐन बहरात पाऊस न मिळाल्याने शेंगा पुरेपूर भरल्या नाहीत. यामुळे याच्या उत्पादनावर परिणाम होणार असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
पिके ऐन बहराच्या काळात पाऊस उघडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. याला काहीसा दिलासा मिळाला आहे. यात गेल्या महिन्यात अतिवृष्टीने तालुक्याच्या पश्चिम भागातील भातशेतीचे बऱ्याचशा ठिकणी नुकसान झालेले होते. मात्र, आता पावसाचे आगमन झाल्याने उर्वरित भात शेतीही चांगली आहे.
शेतीला नेहमीच निसर्गाच्या या लहरीपणाला सामोरे जावे लागत आहे. यातच आता पावसाच्या आगमनाने पिके टवटवीत दिसू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक वाया न जाता काहीतरी हाताशी राहील, अशी शेतकऱ्याला आशा वाटू लागली आहे.
(चौकट)
वाया जाणारे पीक बहरू लागले..
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. खरिपाच्या पिकांना या पावसाने संजीवनी मिळाली असून, पावसाअभावी वाया जाणारे पीक पुन्हा बहरू लागले आहे. यामुळे काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने गणेशाच्या आगमनाबरोबर पुन्हा हजेरी लावल्याने सर्वांनाच हायसे वाटू लागले आहे.