खंडाळ्यासाठी दहा व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करा : भरगुडे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:40 IST2021-04-23T04:40:42+5:302021-04-23T04:40:42+5:30
खंडाळा : ‘खंडाळा तालुक्यात आरोग्य विभाग रात्रंदिन काम करीत आहे. प्रशासन वेगवेगळ्या पातळीवर आढावा बैठका घेण्यात व्यस्त आहे. आरोग्य ...

खंडाळ्यासाठी दहा व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करा : भरगुडे-पाटील
खंडाळा : ‘खंडाळा तालुक्यात आरोग्य विभाग रात्रंदिन काम करीत आहे. प्रशासन वेगवेगळ्या पातळीवर आढावा बैठका घेण्यात व्यस्त आहे. आरोग्य विभागाला आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आहे. त्याचबरोबर खंडाळा तालुक्यासाठी दहा व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांनी केली.
प्रसिद्धिपत्रकात भरगुडे-पाटील यांनी म्हटले आहे की, खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता अनेकांना बेड उपलब्ध होत नाहीत. कोरोना उपचारासाठी सामान्यांची परवड होत आहे. तरीही लोकांचे जीव वाचविण्यासाठी आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका व स्टाफ अहोरात्र काम करीत आहे. लोकांची कोरोना चाचणी करणे, बाधितांना उपचारासाठी दाखल करणे, लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना देखरेखेखाली ठेवणे, उर्वरित लोकांचे लसीकरण करणे यासाठी आरोग्य यंत्रणा झटत आहे. मात्र हे सर्व करीत असताना प्रशासनाच्या प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या मिटिंगला त्यांना उपस्थित राहावे लागत आहे. वास्तविक, आरोग्य कर्मचाऱ्यांना मिटिंगला न बोलवता जी माहिती हवी ती जागेवर जाऊन उपलब्ध करावी. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जाणार नाही.
त्याचबरोबर खंडाळा तालुक्यासाठी अत्याधुनिक सुविधा असणारे ५० ऑक्सिजन बेड व किमान १० व्हेंटिलेटर बेडची सुविधा असलेले हॉस्पिटल शासनाच्या वतीने सुरू करावे, अशीही मागणी त्यांनी केली.