साताऱ्यातील दोघांत सशस्त्र मारामारी
By Admin | Updated: January 9, 2015 00:01 IST2015-01-08T22:10:25+5:302015-01-09T00:01:27+5:30
आरटीओ कार्यालयाजवळील घटना : पोलीस घटनास्थळी; जिल्हा रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

साताऱ्यातील दोघांत सशस्त्र मारामारी
सातारा : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात रेडियम नंबर प्लेट तयार करणाऱ्या व रिफ्लेक्टर बनविणाऱ्या दोघांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर दोघांच्याही नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
याबाबत जिल्हा रुग्णालय व संबंधित जखमींच्या नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, सादिक मज्जीद सय्यद (वय ४४, रा. सत्त्वशीलनगर, सातारा) आणि अलिम रुस्तम शेख (वय २०, रा. गुरुवार पेठ, सातारा) हे दोघेही नातेवाईक आहेत. सय्यद हे रेडियम प्लेट तर अलिम हा रेडियम रिफ्लेक्टरचे काम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात करतात. गुरुवारी दुपारच्या सुमारास काहीतरी कारणावरून या दोघांत भांडण झाले. त्यातून दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत. सय्यद यांच्या डोक्याला जखम झाली आहे, तर अलिम शेखच्या पाय, हातावर जखमा झाल्या आहेत.
दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या मारहाणीचे वृत्त समजताच दोघांच्याही नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली.
त्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळपर्यंत तक्रार घेण्याचे काम सुरू
होते. (प्रतिनिधी)
पोलिसांची तत्परता...
आरटीओ आॅफिसजवळील भांडणाबद्दल पोलीस मुख्यालयात प्रथम फोन करण्यात आला. त्यानंतर तिथून पीसीआर मोबाईल नं. १ आणि सदर बझार बीट मार्शल नं. ३ ला वायरलेसवरून मेसेज देण्यात आला. दोन्हीही वाहने तातडीने आरटीओ आॅफिसजवळ आली. त्यावेळी दोघांचीही भांडणे सुरूच होती. अनेकजण तेथे जमले होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
भांडणाचे कारण अस्पष्ट...
दोघांमध्ये भांडणे कशावरून झाली, याचे कारण सायंकाळपर्यंत अस्पष्ट होते. व्यवसायावरून की घरगुती कारणातून हा प्रकार झाला याबद्दल पोलीसही सांगू शकत नव्हते. तक्रार नोंद झाल्यानंतरच खरे कारण समोर येईल, असेही पोलिसांनी सांगितले.