वाईत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा
By Admin | Updated: April 16, 2015 00:04 IST2015-04-15T23:05:53+5:302015-04-16T00:04:11+5:30
चाकूचा धाक दाखवून लुटले : पोलिसांच्या पथकाची तत्काळ कारवाई; एका आरोपीला पकडण्यात यश

वाईत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा
सातारा : दुकान मालकाला चाकूचा धाक दाखवून सहा दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचा तब्बल दीड लाखाचा ऐवज चोरून नेला; परंतु त्याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ आरोपींचा शोध घेऊन एकाला पकडण्यात यश आले. ही घटना वाई येथील धर्मपुरी महावीर चौकातील एका ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण शंकरलाल ओसवाल (रा. धर्मपुरी, वाई) यांचे धर्मपुरीतील चौकात ‘सोनमल डोंगरजी अॅन्ड सन्स’ या नावाचे दुकान आहे. प्रवीण ओसवाल हे मंगळवारी दुपारी पुण्याला गेले होते. त्यांना घरी परत येण्यास रात्री उशीर झाला. रात्री दोनच्या सुमारास ते वाई येथे आले. त्यानंतर घराकडे चालत जात असताना त्यांना दुकानाला कुलूप लावले नसल्याचे दिसले. ‘कुलूप लावायचे वडील विसरले की काय,’ असे प्रवीण यांना वाटले. त्यामुळे ते घरी गेले. घरी गेल्यानंतर वडिलांना त्यांनी ‘दुकानाला कुलूप का लावले नाही,’ असे विचारले. त्यावेळी वडिलांनी ‘मी दुकानाला कुलूप लावले आहे,’ असे सांगितले. हे ऐकून प्रवीण ओसवाल यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत मित्र होता. ओसवाल यांनी दुकानामध्ये प्रवेश केल्यानंतर दुकानात सहाजण होते. त्यातील एकाने ओसवाल यांना चाकूचा धाक दाखविला. ओसवाल यांना ढकलून देऊन सगळे दरोडेखोर पळून गेले. खाली चौकामध्ये गस्तीवर असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ याची दखल घेऊन आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी धर्मपुरीपासून काहीअंतरावर एका आरोपीला पकडण्यात यश आले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने देवराज बाबू जाधव (वय २०, रा. कवठे एकंद, ता. तासगाव जि. सांगली) असे नाव सांगितले.दुकानातून पळून जाताना दरोडेखोरांनी सोन्या-चांदीचे दागिने त्यामध्ये सोन्याची चमकी, लाखी डोरल्याचे २६ नग, सोन्याचे टॉप्स जोड एक, सोन्याची अंगठी, चेन, नेकलेस, तुकडा काळे मनी पॅकेट, चांदीची जोडवी, सोने लाखी डोरली २६ नग असा दीड लाखाचा ऐवज त्यांनी लंपास केला; परंतु आरोपी देवराज जाधवकडून काही ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, पळून जाण्यात यशस्वी झालेल्या आरोपींकडे अजून ऐवज आहे. (प्रतिनिधी)
संशयित टोळी रेकॉर्डवरील !
वाई दरोड्यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे इतर आरोपींचीही नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. ही टोळी रेकॉर्डवरील असल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांतच या टोळीतील उर्वरित दरोडेखोरांच्या मुसक्या आवळू, असे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ !
वाई येथील धर्मपुरी चौकामध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा पडल्याने इतर व्यावसयिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानाची कुलपे व्यवस्थित आहेत का, याची खातरजमा सुरू केली आहे. तर काहीनी दुकानासमोर सुरक्षारक्षक नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिसांनी या टोळीचा छडा लावावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.