पोलिसांवर सशस्त्र हल्ला

By Admin | Updated: August 29, 2015 00:45 IST2015-08-29T00:45:17+5:302015-08-29T00:45:17+5:30

एक कर्मचारी जखमी : अट्टल दरोडेखोराचा पाठलाग करताना महिलांकडून दगडफेक; सूत्रधार फरार

Armed attack on police | पोलिसांवर सशस्त्र हल्ला

पोलिसांवर सशस्त्र हल्ला

शिरवळ : अट्टल दरोडेखोराच्या मागावर असलेल्या शिरवळ पोलिसांवर सुमारे पंधरा महिलांनी काठ्या-कुऱ्हाडींनी हल्ला केला. पोलिसांवर तुफान दगडफेकही करण्यात आली. या घटनेत एक पोलीस किरकोळ जखमी झाला असून, या गोंधळाचा फायदा घेत जबरी चोरीच्या गुन्ह्यात हवा असलेला मुख्य सूत्रधार फरार झाला. ही घटना खंडाळा गावच्या हद्दीत घडली आहे.खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीतील जबरी चोरीप्रकरणी शिरवळ पोलिसांनी दोनजणांना दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार साथीदारांसह फरार झाला होता. शिंगरे वस्ती येथे सादिक उस्मान शेख (वय २१, मूळ रा. मोहादरी, ता. चिखली, जि. बुलडाणा) हे भाड्याच्या घरात मित्रांसमवेस राहण्यास आहेत. एका खासगी कंपनीत ते नोकरी करतात. दहा आॅगस्टच्या रात्री तीनच्या दरम्यान पप्या लाल्या शिंदे (रा. सुरवडी, ता. फलटण) हा साथीदारांसमवेत
आला. दरवाजा वाजवून घरात प्रवेश करीत त्याने धमकावून घरातील दोन मोबाईल, बॅगा, कपडे व रोख रक्कम असा २२ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. शिरवळ पोलिसांनी याप्रकरणी शरद गंगाराम चव्हाण (२०, मूळ रा. वावरहिरे, ता. माण, सध्या रा. सुरवडी, ता. फलटण) अविनाश दत्तात्रय जाधव (२१, रा. सुरवडी, ता. फलटण) यांना मोठ्या शिताफीने अटक केली होती. निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोरखनाथ बोबडे, पोलीस हवालदार रवींद्र कदम, अमोल जगदाळे, विनोद पवार यांनी ही कारवाई केल्यानंतर संशयितांना न्यायालयाने दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, मुख्य सूत्रधार पप्या लाल्या शिंदे व त्याच्या साथीदारांना शोधण्यासाठी पोलिसांनी ‘कोम्बिंग आॅपरेशन राबविले. पोलिसांची चाहूल लागल्याने तो साथीदारांसमवेत फरार झाला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करताना मळा नावाच्या शिवाराजवळ १४ ते १५ महिलांनी पोलिसांवर काठ्या, कुऱ्हाडीने हल्ला केला. यात पोलीस हवालदार स्वप्निल दौंड किरकोळ जखमी झाले. दरम्यान, या गोंधळाचा फायदा घेत पप्या लाल्या शिंदे साथीदारांसह फरार झाला. जबरी चोरीची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, हवालदार रवींद्र कदम तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)


दीडशे गुन्ह्यांमधील ‘वाँटेड’
पप्या लाल्या शिंदे जाळ््यात सापडल्यास लोणंद, खंडाळा, शिरवळ परिसरातील सुमारे दीडशे गुन्हे उघड होऊ शकतात, असे पोलिसांनी सांगितले. यात जबरी चोऱ्या आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान, पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दुर्पा लाल्या शिंदे व इतर १४ ते १५ महिलांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक एस. ए. जावीर तपास करीत आहेत.

Web Title: Armed attack on police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.