कोपर्डे विभागात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:37 IST2021-03-25T04:37:32+5:302021-03-25T04:37:32+5:30
गत चार ते पाच वर्षांपासून टोमॅटो पीक हे दराबाबतीत शाश्वत राहीले नाही. अनेकांना दर न मिळाल्याने तोटाच सहन करावा ...

कोपर्डे विभागात टोमॅटो लागवडीचे क्षेत्र वाढले
गत चार ते पाच वर्षांपासून टोमॅटो पीक हे दराबाबतीत शाश्वत राहीले नाही. अनेकांना दर न मिळाल्याने तोटाच सहन करावा लागला आहे; मात्र दर चांगला लागेल याच आशेवर शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. २० मार्चपासून उन्हाळी हंगामातील टोमॅटोच्या लागणीस प्रारंभ झाला असून पंधरा एप्रिलपर्यंत या लागणी सुरु असणार आहेत. लागण केल्यापासून ७० ते ७५ दिवसात टोमॅटोच्या तोड्यास सुरुवात केली जाते. काही शेतकऱ्यांना पावसाळ्यात टोमॅटोच्या तोड्यास सुरुवात होणार आहे. काही वर्षांपासून नवनवीन आधुनिक पद्धतीने शेतकरी उत्पादन घेत असल्याने उत्पादनात वाढ झाली आहे.
मच्चिंग पेपरचा वापर, ठिबक सिंचन, ड्रिपमधून खतांचा वापर, रोपे जगविण्यासाठी लहान पाईपचा वापर, शेतात प्रकाशासाठी विजेचा वापर, रात्रीच्या औषधांच्या फवारण्या, शेताच्या चारी बाजूंनी नेटचा वापर आदींचा वापर केला जातो. तसेच जादा उत्पादन देणाऱ्या रोपांचा वापरही केला जातो.
कोपर्डे हवेली परिसरात कोपर्डे हवेली, नडशी, शिरवडे, पार्ले, उत्तर कोपर्डे, बनवडी, वडोली निळेश्वर आदी गावातील शेतकरी उन्हाळी हंगामात इतर हंगामाच्या तुलनेत जादा क्षेत्रावर टोमॅटोचे उत्पादन घेतात. या हंगामात नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामध्ये वाढते तापमान, वळीव पाऊस, किडीचा प्रादुर्भाव, रोपांची मर, फुलगळती आदींचा सामावेश असल्याने उत्पादन खर्च वाढतो. मुंबई बाजारपेठेत सरासरी दहा किलोला दोनशे रुपये दर असेल तरच टोमॅटोची शेती परवडत असल्याचे टोमॅटो उत्पादक शेतकरी सांगतात.
- चौकट
टोमॅटोचा दर वाढण्याची कारणे
आंब्याला दर चांगला असेल तर टोमॅटोचा दर वाढतो, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. अवकाळी पाऊस, जादा तापमानाने उत्पादन कमी होणे, इतर भाजीपाल्याची आवक कमी असणे, मागणीपेक्षा पुरवठा कमी होणे, टोमॅटो लागणीचे क्षेत्र घटणे आदी कारणाने टोमॅटोला दर चांगला मिळतो.
- कोट
उन्हाळी हंगामात टोमॅटोचे उत्पादन ही एक लॉटरी आहे; पण इतर हंआमाच्या तुलनेत दर बरा मिळतो. शिवाय टोमॅटोचे पीक काढून त्याच तारावर काकडी, दोडक्यासारखा वेलवर्गीय भाजीपाला घेता येतो. सध्या मी दिड एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे.
- भाऊसाहेब चव्हाण
शेतकरी, कोपर्डे हवेली
- चौकट
मुंबई बाजारपेठेत टोमॅटोचा दर
जानेवारी २०१९ : १०० ते १३०
एप्रिल २०१९ : १५ ते २०
जून २०१९ : ३५० ते ४००
डिसेंबर २०१९ : १०० ते १६०
जानेवारी २०२० : ५० ते ६०
जुन २०२० : १९० ते २००
जानेवारी २०२१ : १०० ते १५०
मार्च २०२१ : २०० ते २५०
फोटो : २४केआरडी०२
कॅप्शन : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथील शेतकऱ्यांनी पाईप, मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोच्या रोपांची लागण केली आहे.