हद्दवाढीत समाविष्ट भागाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:26+5:302021-06-09T04:47:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेला ग्रामीण व त्रिशंकू भागातील मंजूर विकासकामे आर्थिक तरतुदीसह सातारा ...

हद्दवाढीत समाविष्ट भागाचा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेला ग्रामीण व त्रिशंकू भागातील मंजूर विकासकामे आर्थिक तरतुदीसह सातारा नगरपरिषदेकडे वर्ग करावीत, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केल्या.
शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी खा. उदयनराजे भोसले यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, सातारा गटविकास अधिकारी चव्हाण, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील, पंचायत समिती सदस्य रामदास साळुंखे व संजय घोरपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
उदयनराजे म्हणाले, १५ व्या वित्त आयोगातून शाहूपुरी, विलासपूर, दरे, खेड या पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचायतींचा निधी पालिकेकडे वर्ग करणे क्रमप्राप्त आहे. तथापि असा निधी वर्ग केला नसल्याने काही भाग विकासापासून वंचित राहिला आहे. या भागांचा विकास साधण्यासाठी निधी पालिकेकडे तात्काळ वर्ग करावा.
दरे येथील बहुतेक भाग पालिकेत समाविष्ट झाल्याने उर्वरित भागाची ग्रामपंचायत बरखास्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा भाग ना ग्रामपंचायतीत आहे ना पालिकेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची बिले लोकवर्गणी काढून भरली जात आहेत. जिल्हा परिषदेने दरे स्वतंत्र दरे ग्रामपंचायत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. शाहुपूरी ग्रामपंचायत अस्तित्वात असताना म्हणजेच ७ सप्टेंबर २०२० पूर्वीची १० लाख अंदाजपत्रकीय रकमेची विकास मे मंजूर करण्यात आलेली आहेत. परंतु या कामाचे कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. अशी कामे नगरपरिषदेकडे वर्ग केल्यास, मंजूर कामानुसार विकासकामे मार्गी लागतील व नागरिकांना अधिक सुविधा मिळू शकेल.
देगाव व कोडोली एमआयडीसी येथे क्रीडांगण विकसित करण्याबाबत आजवर कोणती कार्यवाही झाली, याचीही माहिती खा. उदयनराजे यांनी जाणून घेतली. जिल्हा परिषदेचा सेस निधी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांना समान निकषाप्रमाणे वितरीत करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. या वेळी माजी जिल्हा परिषद सभापती सुनील काटकर, सुनील सावंत, समृध्दी जाधव, फिराज शेख, बाळासाहेब ननावरे, प्रताप शिंदे, जितेंद्र्र खानविलकर, संजय दाणे यांच्यासह शाहुपूरी, दरे, विलासपूर, खेडमधील नागरिक उपस्थित होते.