अरबी समुद्राच्या अवकाशात तरंगता ‘सातारी साखरपुडा’
By Admin | Updated: December 27, 2015 00:09 IST2015-12-26T23:55:09+5:302015-12-27T00:09:40+5:30
रोहन-मनालीचा अनोखा सोहळा : पॅरास्लायडिंगद्वारे दोघेही एकमेकांना अंगठी घालणार

अरबी समुद्राच्या अवकाशात तरंगता ‘सातारी साखरपुडा’
सातारा : आगळ्या वेगळ्या पद्धतीने लग्न किंवा साखरपुडा सोहळा साजरा करण्याची परंपरा तशी परदेशात रंगलेली. मात्र, साताऱ्याच्या दोन घराण्यांनी अरबी समुद्राच्या अवकाशात नियोजित वधू-वराचा साखरपुडा करण्याचा घाट
घातलाय.
साताऱ्याच्या दूरसंचार खात्यात काम करणाऱ्या श्रीपाद वाळिंबे यांची २४ वर्षीय मुलगी मनाली हिचा विवाह शेजारीच राहणाऱ्या रोहन दिलीप कुलकर्णी या २५ वर्षीय तरुणासोबत ठरला आहे. मंगळवारपेठेतील विश्वेश्वर मंदिराजवळ राहणाऱ्या या दोन्ही घराण्यांनी आपल्या मुलांचा साखरपुडा शनिवार, दि. २ जानेवारी रोजी निश्चित केला.
हा सोहळा वेगळ्यापद्धतीने झाला पाहिजे, असा आग्रह मनालीने धरला. मनालीने जर्मन भाषेत उच्च पदवी घेतल्यानंतर जर्मनीच्याच एका नामवंत कंपनीत नोकरी धरली आहे. तर तिचा नियोजित वर रोहन हाही एका कंपनीत अभियंता म्हणून काम करीत आहे. मनालीचा आग्रह पाहून रोहननेही आगळा-वेगळा ‘इव्हेंट’ साजरा करण्याचा निर्णय घेतला.
कर्दे बीचजवळच मुरुड नावाचा परिसर असून, येथे अनेक वर्षांपासून समुद्रातल्या बोटींमधून ‘पॅरास्लायडिंग’ केले जाते; मात्र या माध्यमाचा अशाप्रकारे वापर होऊ शकतो, हे मात्र रोहन अन् मनाली प्रथमच जगाला दाखवून देणार आहेत. (प्रतिनिधी)