एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:10+5:302021-04-04T04:40:10+5:30
सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात उन्हामुळे जिल्ह्याचा ...

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप...
सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ होत असल्याने थंडी गायब झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात उन्हामुळे जिल्ह्याचा ताप वाढणार आहे. तसेच लवकरच कमाल तापमान ४० अंशावर जाण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात हिवाळी ऋतूमध्ये थंडीचे प्रमाण कमी होते. एकवेळ फक्त तापमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. मात्र, त्यानंतर तापमान हे सतत १४ ते १५ अंशावर राहिले. त्यामुळे यंदा थंडीची तीव्रता अधिक जाणवली नाही. त्यातच फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ झाली. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. मार्च महिन्यातच कमाल तापमानही ३९ अंशापर्यंत पोहोचले होते, तर आता एप्रिल महिना सुरू झाल्यापासूनही कमाल तापमान ३८ अंशापर्यंत आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ऊन वाढले आहे. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहे.
सातारा शहरातही उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. यामुळे सातारकर उकाड्याने हैराण झाले आहेत. पुढील दीड महिना तरी उन्हाची तीव्रता राहणार आहे.
चौकट :
३८.९ पर्यंत पोहोचले तापमान...
जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत कमाल तापमान हे ३८.०९ अंशापर्यंत पोहोचले आहे. २९ मार्चला साताऱ्यात या तापमानाची नोंद झाली होती.
त्याचबरोबर मागील पाच दिवसांपासून ३७ अंशावर तापमान कायम आहे. १ एप्रिलला ३८.०२, २ एप्रिल रोजी ३७.०७ कमाल तापमान नोंद झाले होते, तर ३ एप्रिलला साताऱ्यात ३८ अंशावर पारा होता.
................................
असा राहील आठवडा...
जिल्ह्यात किमान तापमानात सतत चढ-उतार सुरू आहे. कधी १७ अंशापर्यंत खाली येते, तर काहीवेळा पारा २० अंशापर्यंत जात आहे. मात्र, कमाल तापमान ३७ अंशावर कायम आहे. तरीही काहीवेळा ढगाळ वातावरण तयार होत आहे. यामुळे कमाल तापमान वाढत असले तरी उतारही येत आहे. मात्र, येत्या काही दिवसांत कमाल तापमान ४० अंशापर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.
फोटो ओळ : सातारा शहरातील कमाल तापमान ३८ अंशावर जात असल्याने उन्हाची तीव्रता जाणवते. त्यामुळे दुपारच्या सुमारास मुख्य रस्त्यावरही तुरळक गर्दी दिसून येते. (छाया : नितीन काळेल)
................................................................