फलटण शहरातील विविध चौकांचा सुशोभीकरण ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:59+5:302021-02-05T09:11:59+5:30

फलटण : फलटण शहरातील विविध चौकांचे सुशोभीकरण, शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती व गरजेच्या ठिकाणी अधिक कॅमेरे बसविणे, शहरातील ...

Approved resolution for beautification of various squares in Phaltan city | फलटण शहरातील विविध चौकांचा सुशोभीकरण ठराव मंजूर

फलटण शहरातील विविध चौकांचा सुशोभीकरण ठराव मंजूर

फलटण : फलटण शहरातील विविध चौकांचे सुशोभीकरण, शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती व गरजेच्या ठिकाणी अधिक कॅमेरे बसविणे, शहरातील बेघरांसाठी निवारा घरांची उभारणी आणि विविध विकासकामांना मंजुरी अशा विषयपत्रिकेवरील २१ विषयांना नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने देण्यात आली. विरोधकांच्या सहा उपसूचना बहुमताने फेटाळण्यात आल्या.

फलटण पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा नीताताई नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, अशोकराव जाधव, मधुबाला भोसले, पांडुरंग गुंजवटे, अजय माळवे, विक्रम जाधव, सनी अहिवळे, सचिन अहिवळे, किशोरसिंह नाईक निंबाळकर, असिफ मेटकरी, वैशालीताई चोरमले, रंजना कुंभार, प्रगतीताई कापसे, ज्योत्स्ना शिरतोडे, मदलसा कुंभार, मंगलादेवी नाईक निंबाळकर आदी नगरसेवक, मुख्याधिकारी प्रसाद काटकर सहभागी झाले होते.

फलटण शहर व तालुक्यातील व्यापारी, उद्योजक यांच्या सहकार्याने शहराची गरज ओळखून शहरातील चौकाचौकांत बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे, शहर पोलीस ठाण्यात असलेले त्याचे नियंत्रण कक्ष याची दुरुस्ती, नियमित देखभाल आणि गरज असेल तेथे आणखी काही सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नगर परिषदेच्या माध्यमातून बसविण्याचा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला. एका कंपनीने शहरातील चौक स्वखर्चाने विकसित व सुशोभित करण्याबाबत नगर परिषदेस पत्राद्वारे कळविले आहे. कंपनीचा प्रस्ताव एकमताने स्वीकारण्यात आला. शहरातील अन्य चौक व प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. केंद्र शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेंतर्गत शहरातील सुमारे ४८ बेघर लोकांसाठी शिवाजीनगर येथील सिटी सर्व्हे नंबर ६४८७ मध्ये निवारा उभारुन त्यांचे तेथे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या योजनेस, तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजना, नागरी दलितेत्तर योजना, तीर्थक्षेत्र विकास योजना, तिसरी सुधारित विकास योजना, जिल्हा वार्षिक योजना, वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध निधीतून शहरातील विविध विकासकामे करण्याचे ठराव या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आले. पालिका कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याच्या विषयासह एकूण २१ विषय या सभेत मंजूर करण्यात आले.

नगर परिषदेकडील प्रलंबित देयके अदा करणे, आण्णाभाऊ साठे योजनेतून कामे करणे, सांस्कृतिक भवनामागील बहुउद्देशीय सभागृह उभारणेच्या कामास मुदतवाढ, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान, नागरी दलितेत्तर, तीर्थक्षेत्र विकास, आदी योजनांमधून विकासकामे करण्याच्या प्रस्तावास विरोधकांनी उपसूचना मांडून विरोध केल्यानंतर ही उपसूचना फेटाळून बहुमताने हे सर्व विषय मंजूर करण्यात आले.

Web Title: Approved resolution for beautification of various squares in Phaltan city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.