मलकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास तत्वतः मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:17+5:302021-02-13T04:37:17+5:30
मलकापूर : ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मलकापूर प्राथमिक ...

मलकापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास तत्वतः मंजुरी
मलकापूर : ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मलकापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रक्रियेचा चेंडू आता स्थानिक प्रशासनाच्या कोर्टात असून, जागेच्या उपलब्धतेसह तातडीने कागदी सोपस्कर केल्यास मलकापुरात सर्वसामान्यांसाठी लवकरच आरोग्य सेवा उपलब्ध होईल.
‘सर्वांसाठी आरोग्य’ हे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्याची बांधिलकी शासनाने स्वीकारली आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रतिबंधक, प्रवर्तक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा जनतेला देण्याकरिता आरोग्यविषयक सुविधांचे जाळे उभारण्याचा राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागात दर ३० हजार लोकसंख्येसाठी एक, तर डोंगरी भागात २० हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. तसेच दर ५ हजार लोकसंख्येसाठी एक आरोग्य उपकेंद्र, तर डोंगरी भागात ३ हजार लोकसंख्येसाठी एक या निकषाप्रमाणे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. वाढती लोकसंख्या विचारात घेता काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची मागणी केली होती. कराड दक्षिणेमधील १६ गावे व मलकापूर शहराला काले प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेद्रांद्वारे आरोग्य सेवा दिली जाते. सध्या मलकापूर शहराचीच लोकसंख्या ३५ हजारांवर गेली आहे. मलकापूर शहरासह इतर १६ गावांतील वाढत्या लोकसंख्येला आरोग्यसेवा देण्यासाठी ही यंत्रणा अपुरी पडत असल्याचे अनेकवेळा समोर आले होते. याचा विचार करून स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र मिळावे, अशी मागणी मलकापूर नगरपालिका प्रशासनाने शासनस्तरावर केली होती. त्या मागाणीनुसार माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शिफारस केली होती. या शिफारशीचा विचार करून शासनाच्या आरोग्य विभागाने मलकापूरसाठी स्वतंत्र प्राथमिक आरोग्यकेंद्रास नुकतीच तत्वतः मंजुरी दिली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेच्या पर्यायासह कागदपत्रांचे सोपस्कर लवकरात लवकर करण्याचे पत्रही स्थानिक प्रशासनाला मिळाले असल्याचे खात्रीलायक वृत आहे. या मागणीनुसार कागदोपत्री पूर्तता स्थानिक प्रशासनाने केल्यास लवकरच मलकापुरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मलकापुरात सर्वसामान्यांसाठी लवकरच आरोग्य सेवा उपलब्ध होईल.
चौकट
८० हजार लोकसंख्येला फक्त २३ स्टाफ
कराड दक्षिणेमधील १६ गावे व मलकापूर शहरातील नागरिकांना काले प्राथमिक आरोग्य केंद्र व ५ उपकेद्रांद्वारे आरोग्य सेवा दिली जाते. काले प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑफिसर ते शिपाई १३, ५ उपकेंद्रात प्रत्येकी २ प्रमाणे १०, असे एकूण फक्त २३ कर्मचारी कार्यरत आहेत. केवळ २३ कर्मचारी तब्बल ८० हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा देतात.
चौकट
३५ हजार लोकसंख्येच्या सेवेत केवळ दोन कर्मचारी
२ मेडिकल ऑफिसर, २ सहाय्यक डॉक्टरांसह क्लार्क, शिपाई फार्मासिस्ट, ड्रायव्हर व सिस्टर असा अपुरा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. मलकापूर शहरातील ३५ हजार लोकसंख्येला केवळ दोनच आरोग्य कर्मचारी सेवा देतात. ऐनवेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही कसरत करावी लागते. मलकापुरात स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध होणार आहे.