आठ लाखांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी
By Admin | Updated: March 15, 2016 00:44 IST2016-03-14T21:31:16+5:302016-03-15T00:44:36+5:30
पाचगणी पालिका : रस्ते दुरुस्ती, टेबल लँड, दलित वस्ती, ईटीपी प्लँटसाठी निधीची तरतूद

आठ लाखांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी
पाचगणी : २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे ८ लाख, ८ हजार ८८५ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक पाचगणी पालिकेत बहुमताने मंजूर करण्यात आले.नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात झालेल्या विशेष अर्थसंकल्पीय सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला. जमेच्या बाजूस २४ कोटी ५९ लाख ५० हजार ६१४ रुपये व खर्चाच्या बाजूस २४ कोटी ५१ लाख ४१ हजार ७२७ रुपंयाचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नव्यानेच प्रॉपर्टी हस्तांतरण व लोकसेवा हक्कांसाठीचा १ टक्के आणि मिळकत करासाठी दीड टक्के कराची भरीव तरतुद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात जमेच्या बाजूस महसुली उत्पन्नाअंतर्गत संकलित करातून १ कोटी ५० लाख, शिक्षण करामधून ५० लाख, शॉपिंग सेंटर गाळे भाड्यापोटी ३० लाख, प्रवासी कर १ कोटी ५० लाख, प्रॉपर्टी हस्तांतरण करातून २० लाख, लोकसेवा हक्क करातून ५० लाख, नगरपालिका गुंतवणूक बँक व्याज ५० लाख रुपये व इतर बाबींमधून उत्पन्न अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
खर्चाच्या बाजूस नगरपालिका हद्दीतील रस्ते दुरुस्ती व नूतनीकरण १ कोटी ५० लाख रुपये, नवीन पर्यटन स्थळ निर्मिती ८० लाख, घनकचरा प्रकल्प उभारणी १ कोटी १६ लाख ४१ हजार, स्वच्छ भारत मिशन अभियानाकरिता खर्च ५० लाख, स्वच्छ महाराष्ट्र अभियान २५ लाख, अपंग व्यक्ती कल्याणकारी योजनेकरिता १० लाख ८६ हजार, टेबल लँड स्टॉल पुनर्वसन ३० लाख, दलीत वस्ती सुधारणा खर्च ९० लाख, मटन मार्केट ईटीपी प्लँट ३५ लाख, नगरोत्थान अंतर्गत अभियान खर्च १ कोटी ५० लाख, वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान २ कोटी ५० लाख, इ-गर्व्हनन्स प्रणाली खर्च ८ लाख ५० हजार, इमारत बांधणी सुधारणा २५ लाख रुपये व इतर बाबींपासून खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. महसुली व भांडवली जमा २४ कोटी ५९ लाख ५० हजार ६१४ रुपये आणि खर्चाच्या बाजूला २४ कोटी ५१ लाख ४१ हजार ७२७ रुपये असे दाखविण्यात आले असून, त्यातून ८ लाख ८ हजार ८८५ रुपये शिलकीत नमूद करण्यात आले आहेत. यावेळी उपनगराध्यक्ष लक्ष्मण पार्टे, नगरसेवक दिलीप बगाडे, प्रवीण बोधे, दिलावर बागवान, सुमन रांजणे, सरोज कांबळे, रेखा कांबळे, स्मिता जानकर, संतोष कांबळे, सचिन भिलारे, उज्ज्वला महाडिक, सुमन गोळे, कल्पना कासुर्डे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पालिकेच्या उत्पन्नात होणार वाढ!
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नवनव्या संकल्पना मांडीत उत्पन्नाचे स्तोत्र वाढविण्यासाठीही या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये आगामी काळात प्रॉपर्टी हस्तांतरण व लोकसेवा हक्कांसाठी प्रथमच एक टक्के कर आकारण्यात आला आहे. तर सन २०१५ -१६ साठी चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामध्ये पालिका हद्दीतील मिळकतीसाठी १.५ टक्के कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. हेच या अर्थसंकल्पाचे यावर्षीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.