‘पूजा-गीता’ला वाचविण्यासाठी प्रयत्नाची शर्थ
By Admin | Updated: April 20, 2015 00:01 IST2015-04-19T21:22:01+5:302015-04-20T00:01:52+5:30
कोल्हापूरला अतिदक्षता विभागात उपचार : प्रशासकीय यंत्रणेनं दाखविेली तत्परता; ग्रामस्थांचेही पूर्ण लक्ष--लोकमतचा प्रभाव

‘पूजा-गीता’ला वाचविण्यासाठी प्रयत्नाची शर्थ
भुर्इंज : ओझर्डे, ता. वाई येथील स्फोटात अतिगंभीर जखमी झालेल्या पूजा व गीता रामदास पवार या दोघी उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती कण्हेरी, कोल्हापूर येथील सिद्धगिरी रुग्णालयातील डॉ. अमोल मोहिते यांनी दिली. या दोघींपैकी ६८ टक्के भाजलेली पूजा वाचण्याची खात्री निर्माण झाली असून ८0 टक्के भाजलेल्या गीताला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरुअसल्याचेही डॉ. मोहिते यांनी सांगिलते. दरम्यान, ‘लोकमत’ने उपचाराविना तडफडणाऱ्या पूजा व गीताची कहाणी सविस्तर प्रसिद्ध करताच या दोघींवर उपचारासाठी सर्वच स्थरातील शासकीय अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता दखलपात्र ठरली आहे.
ओझर्डे येथील यात्रेत १२ दिवसांपूर्वी झालेल्या स्फोटात पूजा व गीता या दोन चिमुरड्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सातारच्या दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना पुणे येथे नेण्यास सांगितले. मात्र नातेवाइकांची ऐपत नसल्याने त्यांनी तरडगाव येथे दुसऱ्या नातेवाइकांकडे त्यांना नेले. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काही दिवस त्यांच्यावर उपचार झाले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाइकांना पूजा व गीताला पुन्हा पुणे येथे नेण्यास सांगितले. सातारमध्ये त्यांना आणले असता सातारच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी पुन्हा पुण्याचेच तुणतुणे वाजवले. त्यामुळे नातेवाइकांनी सरळ पूजा व गीताला मूळ गावी भुर्इंज येथे आणले व त्यांच्या मृत्यूची वाट पाहायला सुरुवात केली.
भिरडाचीवाडी, भुर्इंज येथे झोपडीतच तीन ते चार दिवस उपचाराविना तडफडणाऱ्या पूजा व गीताची कैफियत ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी भुर्इंजमध्ये येऊन पूजा व गीताच्या उपचारासाठी पुढाकार घेतला.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याशी त्यांनी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनीही या दोघींवर तातडीने उपचारासाठी हालचाली करण्याबाबत सूचना केल्या. ओझर्डे ग्रामस्थांनीही उपचारासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. त्यावर या दोघींना कोल्हापूर येथे उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले.
जिल्हाधिकारी मुदगल यांनी स्वत: रुग्णालय व्यवस्थापनाशी चर्चा करून उपचाराबाबत चर्चा केली. तसेच प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे या रुग्णालयाच्या ट्रस्टशी जुना स्रेह आहे. त्याचाही फायदा गतीने व योग्य उपचार होण्यासाठी झाला. प्रांताधिकारी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शुक्रवारी रात्री कोल्हापूरला रुग्णालयात गेले. तेथे रात्री उशिरापर्यंत थांबून उपचाराबाबत डॉ. मोहिते आणि डॉ. मिरजे यांच्याशी चर्चा केली आणि पहाटे तेथून वाईला आले.
भुर्इंजचे नारायण पवार यांनी देखील भुर्इंज पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी कायमस्वरुपी कोल्हापूर येथील रुग्णालयात तैनात केला आहे. तसेच त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधून उपचाराच्या खर्चाबाबत विचारपूस केली. त्यावर जिल्हाधिकारी मुदगल, प्रांताधिकारी खेबुडकर यांनी स्वत: याप्रकरणी विशेष लक्ष घातले असून, उपचार मोफत होत असल्याची माहिती दिली. ‘लोकमत’ने डॉ. मोहिते यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, ‘८0 टक्के भाजलेली गीता गंभीर असल्याचे सांगितले.
मात्र या परिस्थितीतही या दोघींना वाचवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. या दोघींच्या तुलनेत पूजा उपचाराला प्रतिसाद देत असून, उपचारांना
उशिरा सुरुवात झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे सांगितले. (वार्ताहर)
उपचारासाठी अधिकारीही सरसावले..
दरम्यान, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख हे ‘लोकमत’चे वृत्त प्रसिद्ध झाले, त्या दिवशी भंडारा येथे न्यायालयीन कामकाजासाठी गेले होते. मात्र त्यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनीही तेथून पूजा व गीताच्या उपचाराबाबत भुर्इंज पोलीस ठाण्यात सूचना दिल्या. तसेच थायलंड येथील भारताचे राजदूत राजेश स्वामी यांनी स्वत: मदत करण्याची तयारी दर्शवून सातारा जिल्ह्यात संपर्क साधून पूजा व गीताच्या उपचाराचा पाठपुरावा केला. शासकीय अधिकाऱ्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे गीता व पूजाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम झाले आहे.