ग्रामविकास अधिकाऱ्याची अखेर कोरेगावला नेमणूक
By Admin | Updated: October 14, 2015 00:01 IST2015-10-13T21:55:07+5:302015-10-14T00:01:28+5:30
ग्रामपंचायत पदाधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला यश

ग्रामविकास अधिकाऱ्याची अखेर कोरेगावला नेमणूक
कोरेगाव : कोरेगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व सदस्यांनी केलेल्या अभिनव आंदोलनामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली आहे. ग्रामसेवक संघटनेच्या पवित्र्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी अरुण गायकवाड या ग्रामविकास अधिकाऱ्यांची मंगळवारी नियुक्ती केली . गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि कामकाजाला सुरुवात केली आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत होत आहे. ग्रामविकास अधिकारी नंदकुमार जगताप यांच्या अकाली निधनानंतर ग्रामसेवक संघटनेने कोरेगावात काम करण्याविषयी असमर्थता दर्शविली होती. स्थानिक विषय जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात ग्रामविकास अधिकारी देण्याबाबत निर्णय झाला, मात्र ज्या ग्रामसेवकाची नियुक्तीचे आदेश काढले जातात, ते रजेवर जाण्याचा प्रकार सुरु झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य दिलीप बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी संघटनेने आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली काढून त्यांच्यापुढे गाऱ्हाणे मांडले, त्यांनी देखील तातडीने अधिकाऱ्यांना सूचना देऊन कोरेगावात ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले, मात्र पंचायत समिती प्रशासन ज्या ग्रामसेवकाची नियुक्ती करते, ते लगेच रजेवर जात असल्याने कामकाज रखडले होते. सरपंच विद्या येवले, उपसरपंच राहूल रघुनाथ बर्गे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप बर्गे, प्रदीप बोतालजी, संतोष चिनके, प्रतिभा बर्गे, रसिका बर्गे, मनोज येवले, शंकरराव बर्गे, डॉ. गणेश होळ, युवराज बर्गे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय ते पंचायत समिती अशी रॅली काढली आणि पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरु केले. कोरेगाव नगरविकास कृती समितीचे पदाधिकारी राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे यांच्यासह नागरिकांनी आंदोलनास पाठिंबा दर्शविला. (प्रतिनिधी)
मासिक सभा लवकरच..--अरूण गायकवाड यांनी धरणे आंदोलनातील कर्मचाऱ्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, ग्रामपंचायतीची मासिक सभा देखील त्यांनी बोलविण्याचे नियोजन केले आहे.