‘स्वच्छ, सुंदर कऱ्हाड’साठी पर्यावरण रक्षकांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST2021-02-05T09:14:16+5:302021-02-05T09:14:16+5:30
स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेत कऱ्हाड शहराला सलग दोनवेळा प्रथम पारितोषिक मिळाले आहे. यावर्षी तिसरे पारितोषिक मिळवून ‘हॅटट्रीक’ करण्याचा पालिकेचा ...

‘स्वच्छ, सुंदर कऱ्हाड’साठी पर्यावरण रक्षकांची नेमणूक
स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेत कऱ्हाड शहराला सलग दोनवेळा प्रथम पारितोषिक मिळाले आहे. यावर्षी तिसरे पारितोषिक मिळवून ‘हॅटट्रीक’ करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. आपले शहर सुंदर व स्वच्छ बनवण्याच्या या प्रक्रियेत आपलेही काही योगदान असावे, या हेतूने शहरातील काही स्वयंसेवी व्यक्तिंनी एकत्र येऊन ‘एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लब’ या संस्थेमार्फत पालिकेला प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावानुसार संस्थेचे स्वयंसेवक शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये काम करून थुंकीमुक्त कऱ्हाड, वृक्षसंवर्धन व वृक्षतोड थांबवणे, प्लास्टिक वापर टाळण्याबाबत जनजागृती करणे, रस्त्यावर कचरा टाकण्यापासून परावृत्त करणे, सुका कचरा व ओला कचरा वेगळा करणे, काळा धूर सोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे या कामाचे आणि दंडात्मक कारवाईचे विशेष अधिकार या स्वयंसेवकांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पालिकेने हा प्रस्ताव मान्य करून एका समारंभात स्वयंसेवकांना पालिकेचे ओळखपत्र, अधिकारपत्र व पर्यावरण रक्षक हे विशेषनाम तसेच एक जर्सी प्रदान केली.
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, सौरभ पाटील, ए. आर. पवार, नगरसेवक विजय वाटेगावकर, नगरसेविका स्मिता हुलवान, एन्व्हायरो फ्रेंडस् नेचर क्लबचे प्रा. जालिंदर काशिद, चंद्रकांत जाधव, शिरीष संभूश, अवधूत लांजेकर, नीलकंठ कुसुरकर, श्रीकांत लोकरे, सुधीर घाटे, संतोष आंबवडे, नीलिमा देशपांडे, रजनी पाटील, वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फोटो : ३१केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाड पालिकेकडून पर्यावरण रक्षकांची नेमणूक करण्यात आली असून या रक्षकांना वेगळी ओळख आणि अधिकारही देण्यात आले आहेत.