प्रांतांकडे अपील; तहसीलदारांकडे याचना!
By Admin | Updated: July 24, 2014 22:30 IST2014-07-24T22:28:21+5:302014-07-24T22:30:45+5:30
-कहाणी एका बिल्डराची...अवैध उत्खनन : कारवाई टाळण्यासाठी कंग्राळकरांकडून जोरदार धावपळ

प्रांतांकडे अपील; तहसीलदारांकडे याचना!
सातारा : राधिका रस्त्यावरील जागेत अनधिकृतरीत्या बेसुमार मुरुम उकरल्याप्रकरणी तहसीलदारांनी बिल्डर श्रीधर कंग्राळकर यांना २२ लाख ९५ हजार ७०० रुपये इतक्या दंडाची नोटीस धाडली आहे. या नोटिसीविरोधात कंग्राळकर यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले असून, प्रांतांच्या न्यायालयाचा पुढील आदेश होईपर्यंत कारवाई करू नये, अशी लेखी याचनाही कंग्राळकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
तहसीलदारांनी धाडलेल्या नोटिसीची मुदत बुधवारी (दि.२३) संपली आहे. या नोटिसीनुसार कारवाई अटळ असल्याने कंग्राळकर यांनी बुधवारीच तहसीलदारांच्या आदेशाविरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे अपील केले आहे.
दरम्यान, राजपत्रित अधिकाऱ्यांनी गुरुवारी राज्यभर आंदोलन पुकारले असल्याने प्रांताधिकारी व तहसीलदार हे दोन्ही अधिकारी आपल्या कार्यालयात नव्हते. त्यामुळे कोणतीच कारवाई गुरुवारी झाली नाही.
दिशा विकास मंचचे अध्यक्ष सुशांत मोरे व ‘रिपाइं’ युथचे जिल्हा कार्याध्यक्ष किशोर गालफाडे यांनी या उत्खननाविरोधात आवाज उठविला आहे. मात्र, पैसे उकळण्यासाठी संबंधितांनी आपल्याविरोधात कार्यवाही केल्याचा आरोप कंग्राळकरांनी केल्याने बुधवारी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला होता. कंग्राळकरांनी माफी मागावी, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असा इशारा सुशांत मोरे यांनी दिला होता. गुरुवारी उशिरापर्यंत माफीनामा कंग्राळकर यांच्याकडून सादर न झाल्याने सुशांत मोरे यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केल्याचे मोरे यांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. (प्रतिनिधी)
कंग्राळकर बिल्डरने राधिका रस्त्यावरील वादग्रस्त जागेत खोदकाम करण्यासाठी सुरुवातीला २७ नोव्हेंबर २०१३ रोजी ५०० ब्रासची व त्यानंतर २७ जानेवारी २०१४ रोजी ५०० ब्रासची परवानगी मागितली होती. प्रतिब्रास २०० रुपयांप्रमाणे या कामाचा महसूल भरला होता. प्रत्यक्षात मात्र त्यांनी तब्बल तीन हजार ८३ ब्रास मुरमाचे उत्खनन केल्याचे पंचनाम्यात स्पष्ट झाले आहे. कंग्राळकर यांच्या एका प्रकल्पात हा प्रकार उघडकीस आला आहे.
अनेकवेळा माझ्यावर दबाव आला; पण तो जुमानला नाही. कंग्राळकरांनी केलेल्या आरोपामुळे मी दुखावलो गेलो आहे. आरोप करणे सोपे असते. माझ्याविरोधात केलेल्या आरोपाबाबत त्यांनी पुरावा सादर करावा; अन्यथा न्यायालयीन लढ्याला तयार राहावे. अब्रूनुकसानीचा दावा भरण्याची तयारी मी सुरू केली आहे.
- सुशांत मोरे, अध्यक्ष दिशा विकास मंच