काकड आरतीसोबतच गोमातेचेही पूजन !
By Admin | Updated: December 11, 2014 23:51 IST2014-12-11T21:46:00+5:302014-12-11T23:51:27+5:30
गोंदवले यात्रा : हजारो भाविकांना गो-शाळेचेही आकर्षण

काकड आरतीसोबतच गोमातेचेही पूजन !
गोंदवले : गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या यात्रेंतर्गत गोंदवले बुद्रूक येथील श्रींच्या समाधी मंदिरात सालाबादप्रमाणे काकड आरतीबरोबरच गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांना गो-शाळेचे आकर्षण असल्याचे दिसून आले.
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या गोरक्षणाचा वारसा गोंदवले बुद्रूक येथील श्रींच्या समाधी मंदिराने आजही जपला आहे. वारंवार येत असलेल्या दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करुन सांडपाण्याचा योग्य वापर करुन गायींसाठी ओला चारा मिळविण्यातही यश मिळविले आहे.
श्री गोंदवलेकर महाराजांनी प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण दिली होती. त्यांच्या गोरक्षण व गोपालनाच्या प्रेमामुळे त्यांना गोपालक ‘श्रीकृष्ण’ अवतारही मानले जाते. श्री गोंदवलेकर महाराजांचा गोपालनाचा वारसा आजही येथील समाधी मंदिर समितीने अखंडपणे सुरू ठेवला आहे. याचेच प्रतीक म्हणून आजही येथील मंदिर परिसरात अखंडपणे सुरू ठेवला आहे. याचेच प्रतीक म्हणून येथील मंदिर आवारात सर्व सोयींयुक्त गोशाळा सुरू केली आहे. ती आजही पाहायला मिळते.
महाराजांच्या शेतातूनच या जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता केली आहे. ओल्या चाऱ्यासाठीही शेतात स्वतंत्र पिके घेतली जातात. दुष्काळी परिस्थितीत चारा मिळविण्यासाठी सांडपाण्याचा योग्य पद्धतीने वापर केला जातो. याशिवाय शेतीसाठी उत्तम प्रतीचे खत उपलब्ध करण्यासाठी अनेक वर्षांपासून येथे गांडूळ प्रकल्प उभारण्यात आला आहे.
जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाचा गांडूळ निर्मितीसाठी उपयोग केला जातोच शिवाय गोबरगॅसच्या माध्यमातून इंधनही मिळविले जाते. गायीपासून मिळणारे दूध येथे येणाऱ्या भाविकांसाठी प्रसादासाठी वापरले जाते. या दुधापासुन बनविलेल्या लोण्याच्या गोळ्याला विशेष महत्त्व आहे. काकड आरतीनंतर भाविकांना लोण्याचा प्रसाद दिला जातो.
जनावरांचे दूध काढण्यासाठीही अत्याधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. गोशाळेतील जनावरांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांकडूनही जनावरांची सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. पूर्वी गोदान करण्याची प्रथा होती.
गोंदवलेकर महाराजांनी दिलेल्या गो-रक्षणाच्या शिकवणीमुळे या ठिकाणी गायींचा मोठा असलेल्या ठिकाणीच श्रींची समाधी स्थानापन्न करण्यात आली आहे. समाधी मंदिरात श्रींच्या समाधीच्या वरच्या भागात गोपालक श्रीकृष्ण मंदिर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रोज पहाटे काकड आरतीच्या वेळी गो-शाळेतील गायींचेही पूजन केले जाते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. (वार्ताहर)
स्वयंचलित नळ
गोंदवले येथे सुरू केलेल्या गोशाळेतील गायींनी पाण्याच्या भांड्याजवळ तोंड नेताच नळाच्या साह्याने पाणी येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी बसविलेल्या स्वयंचलित नळामुळे पाण्याचीही बचत होत असून त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमण्याची गरज भासत नाही.