वाचायचा तरी कोणता फलक...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:39 IST2021-03-19T04:39:12+5:302021-03-19T04:39:12+5:30

साताऱ्यातील पोवई नाक्यावर भुयारी मार्गालगतच्या सेवा रस्त्यावर चाळीस किलोमीटर प्रती तास वेगाने वाहने चालवावीत, असा फलक लावला आहे. ...

Any panel to read ...! | वाचायचा तरी कोणता फलक...!

वाचायचा तरी कोणता फलक...!

साताऱ्यातील पोवई नाक्यावर भुयारी मार्गालगतच्या सेवा रस्त्यावर चाळीस किलोमीटर प्रती तास वेगाने वाहने चालवावीत, असा फलक लावला आहे. त्याच्यावरच दुसरा फलक शहर बस थांबा याचा आहे. त्यामुळे चालकांनी ऐकायचे तरी कोणाचे, असा प्रश्न पडत आहे. (छाया : जावेद खान)

१८सातारा-ग्रेड

००००००

वानरसेना शहराकडं

सातारा : साताऱ्याच्या आजूबाजूला असलेल्या महादरे, यवतेश्वर, पेढ्याचा भैरोबा, अजिंक्यतारा किल्ल्याच्या जंगलात उन्हामुळे पाणी मिळत नाही. तसेच पाने, फुले, फळेही मिळत नसल्याने वानरसेना साताऱ्याच्या दिशेने येत आहे. घर, अंगणातील झाडांचे नुकसान करत आहे.

००००००

ऑनलाइन स्पर्धेत यश

सातारा : येथील सुशीलादेवी साळुंखे ज्युनिअर काॅलेजच्या एकता शिंदे हिने जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत तिसरा तर तन्वी फरांदे हिने चित्रकला स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाइन स्पर्धेत हे यश संपादन केले. यशाबद्दल संस्थेचे कार्यवाह अभयकुमार साळुंखे यांनी कौतुक केले.

०००००

पाणीपुरवठा विस्कळीत

सातारा : साताऱ्याच्या पश्चिमेकडील व्यंकटपुरा, चिमणपुरा, मंगळवार तळे परिसरात दोन दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपात होत आहे. त्यामुळे मंगळवारी या परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी टॅँकरचे पाणी विकत मागवावे लागले होते.

००००

उकाड्यात वाढ

सातारा : साताऱ्याचा पारा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. दिवसभर अंगाची लाहीलाही होत असल्याने सातारकर हैराण होत आहेत. सायंकाळी सहा वाजले तरी उकाडा कमी होत नसल्याने वातावरणात उकाडा जाणवत आहे.

०००००००

घाटात प्रशस्त रस्ता

खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटातील रस्ता रुंद व प्रशस्त झाला आहे. धोकादायक वळणावरही रस्ता विस्तृत असल्याने अवजड वाहतूकही सहज होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना यापूर्वी होत असलेली गैरसोय दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

००००००

आरोग्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात

सातारा : सातारकर आरोग्याच्या बाबतीत चांगलेच सजग असल्याचे पुन्हा जाणवत आहेत. अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी फिरण्यासाठी कुरणेश्वर, महादरे तलावापर्यंत जात आहेत. तसेच सायंकाळीही पिलाई मंदिरापर्यंत जात असतात. तसेच अनेकजण अजिंक्यतारा, पेढ्याचा भैरोबा डोंगरावरही फिरायला जात आहेत.

००००००००

पंख्यांचा वापर वाढला

सातारा : साताऱ्यातील वातावरणात उकाडा जाणवत असल्याने गेल्या काही दिवसांपासून घर, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये पंखे, वातानुकूलित यंत्रांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. तसेच कोरोनाचा धोका असल्याने अनेकजण वातानुकूलित यंत्रणा वापरणे टाळत आहेत.

०००००

ओला कचरा एकत्रच

सातारा : सातारा नगरपालिकेतर्फे गल्लीबोळात घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी पाठविली जाते. पशु-पक्ष्यांना इजा पोहोचू नये, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचे आवाहन केले जाते. मात्र अनेक सातारकर तो एकाच डब्यातून आणत असतात.

०००

फुटबाॅलचे सामने

सातारा : एकेकाळी गल्लीबोळात, घरोघरी क्रिकेटचे वेड असायचे. मात्र गेल्या काही दिवसांपासून फुटबाॅलचे मुलांना वेढ लागत आहे. व्यंकटपुरा पेठेतील सार्वजनिक मैदानावर शाळकरी मुलं सकाळी, सायंकाळी उशिरापर्यंत फुटबाॅल खेळत असतात. त्यामुळे या खेळाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.

०००००

सॅनिटायझरचा विसर

सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढला तसा घरोघरी, शासकीय कार्यालये, दुकानांमध्ये सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करून दिली जात होती. मात्र दरम्यानच्या काळात कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी होऊ लागली अन् सॅनिटायझरचे स्टॅण्ड नावालाच उरले होते.

००००००००

बाजारपेठेत गर्दी

सातारा : कोरोना बाधित रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाही साताऱ्यातील राजपथ, राजवाडा, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातारकरांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव वाढण्याचा धोका वाढत आहे.

०००००००००

कांद्याचे दर ढासळल्याने मागणीत वाढ

सातारा : साताऱ्यातील भाजी मंडईत काही दिवसांपूर्वी कांदा पन्नास ते साठ रुपये किलो दराने विकला जात होता. त्यामुळे सातारकर खरेदी करणे टाळत होते. मात्र हे दर काही दिवसांनंतर गडगडू लागले आहेत. राजवाड्यासमोरील गाड्यावर बुधवारी पंचवीस रुपये किलो दराने विकला जात असल्याने कांद्याला सातारकरांमधून चांगलीच मागणी होत होती. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

००००००

मुलं अभ्यासात मग्न

वडूज : दहावी-बारावीच्या परीक्षा काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे दहावी-बारावीतील मुलं अभ्यासात मग्न आहेत. शासनाचा काहीही निर्णय झाला तरी अडचण येऊ नये म्हणून ते रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करत असून पालकही त्यांची खूपच काळजी घेत आहेत..

०००००००

लग्न घरात चिंता

सातारा : कोरोना रुग्ण वाढत असल्याने कोणत्याही कार्यक्रमात उपस्थितीवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणाला बोलवावे आणि कोणाला नाही, ही चिंता सतावत आहेत. त्यामुळे अनेकांनी घरातच मोजक्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकण्यावर भर दिला जात आहे.

००००००

एकीव शाळेला संगणक संच भेट

पेट्री : एकीव या दुर्गम व डोंगराळ भागातील प्राथमिक शाळेस म्हाते खुर्द येथील माजी विद्यार्थी व उद्योजक सुशांत भिलारे यांनी संगणक संच भेट दिला. आयएसओ मानांकित एकीव शाळेत अनेकविध नवोपक्रम राबवले जातात. याप्रसंगी केंद्रप्रमुख अशोक मनुकर, धनश्री भिलारे, सुधीर उंबरकर, रेश्मा अंबवले , अमित धसवते , उपशिक्षिका मनीषा सातघरे, पूजा प्रभुणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य , कास पठार कार्यकारी समिती अध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: Any panel to read ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.