राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात पवारविरोधी पालकमंत्री
By Admin | Updated: December 26, 2014 23:56 IST2014-12-26T22:00:44+5:302014-12-26T23:56:50+5:30
शिवतारेंची निवड : राष्ट्रवादीच्या अभेद्य बुरुजावर टेहळणीला येणार ‘पुरंदरचा धुरंधर’

राष्ट्रवादीच्या जिल्ह्यात पवारविरोधी पालकमंत्री
राजीव मुळ्ये- सातारा -युतीचे जिल्ह्यातील एकमेव यशस्वी खेळाडू शंभूराज देसाई ‘पालकत्वा’चे पॅड बांधून मैदानात उतरतील किंवा कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्याच्या ओळखीच्या ‘पीच’वर पाय अधिक घट्ट रोवता यावेत म्हणून त्यांच्याकडे साताऱ्याची जबाबदारी सोपविली जाईल, अशीही अपेक्षा व्यक्त होत असतानाच अचानक ‘बॅटिंग आॅर्डर’ बदलली. मोदीलाटेतही राष्ट्रवादीचा बुरूज सलामत ठेवणाऱ्या सातारा जिल्ह्याला कट्टर पवारविरोधक पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या रूपाने मिळणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची चिंता अधिकच गडद झाली आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी पाटण वगळता युतीला कोठेही यश मिळाले नाही. पाच मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहिले, तर दोन काँग्रेसने सर केले. राष्ट्रवादीला दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यात एवढे घवघवीत यश मिळाले नाही. आक्रमक संसदपटू म्हणून लौकिक असणारे शंभूराज देसाई पाटणमधून शिवसेनेकडून निवडून आले. शिवसेना सरकारमध्ये सामील होणार की नाही, हे निश्चित नसल्यामुळे पालकमंत्र्यांच्या निवडीबाबत अंदाज बांधण्यात बरेच दिवस लोटले. सेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर शंभूराज पालकमंत्री होतील, असा अनेकांचा अंदाज होता.
राज्यात इतरत्र ज्या-त्या जिल्ह्यातील नेत्याची पालकमंत्रिपदी वर्णी लागली असली तरी सातारा अपवाद आहे. ‘पुरंदरचे धुरंंधर’ विजय शिवतारे यांच्या खांद्यावर साताऱ्याची धुरा सोपविली गेली. त्यांच्या निवडीची कुणकूण लागल्यापासूनच या निवडीमागील राजकारण आणि निवडीनंतरचे राजकारण या दोनच विषयांभोवती राजकीय वर्तुळात चर्चा फिरत आहेत. राष्ट्रवादीचे विजयी तारे जमिनीवर आले आहेत. (प्रतिनिधी)
पुरंदर हे माझे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्याला लागूनच. दोघांचीही जीवाभावाची नदी नीरा म्हणजे वरदायिनी. त्यामुळं जिल्ह्याचं सुख-दु:ख मला पूर्णपणे ठाऊक. दोन वर्षांपूर्वी मी माण अन् खटावच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी स्वत: आलो होतो. दुष्काळग्रस्तांच्या व्यथा-वेदना मी तेव्हा समजून घेतल्या आहेत. त्यांचा आता पालकमंत्री म्हणून काम करताना खूप फायदा होईल. सातारा जिल्ह्यातील प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी मीसुद्धा सतत प्रयत्न करेन.
- विजय शिवतारे, नूतन पालकमंत्री
पुरंदर तालुक्यात पवार घराण्याच्या विरोधात रान उठविणारे विजय शिवतारे कधीकाळी राष्ट्रवादीतच होते. सहा वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००९ अन् २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. नीरा नदीचे पाणी बारामतीला जाते; पण पुरंदरला का नाही, या प्रश्नावर आंदोलन करणारे शिवतारे सातारा जिल्ह्यातील पाण्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
कसा जपायचा ‘कार्यकर्ता’?
जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या प्रत्येक बैठकीला पालकमंत्री या नात्याने यापुढे विजय शिवतारे हजर राहणार असल्याने आपण प्रस्तावित केलेली कामे ते पुढे सरकू देतील का, अशीही धास्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविकच!
प्रत्येकाला आपापला मतदारसंघ आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ‘कार्यकर्ता’ हा घटक जपायचा आहे. या घटकाची अलीकडील व्याख्या सर्वज्ञात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अधिकच चिंताक्रांत झाले आहेत.
प्रस्थापितांचा प्रभाव कमी करण्यासाठीच...
आमदारकी, खासदारकीच नव्हे, तर जिल्ह्यातील बहुतांश सहकारी संस्था, साखर कारखाने, बँका आणि अन्य सत्ताकेंद्रे राष्ट्रवादीच्या हाती. मात्र, शरद पवारांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे विजय शिवतारे कंबर कसूनच जिल्ह्याच्या रिंगणात उतरणार आणि राष्ट्रवादीचा प्रभाव कमी करण्याचा कसोशीने प्रयत्न करणार, याबाबत कुणाच्या मनात तिळमात्र संदेह नाही. किंबहुना त्यामुळेच त्यांना साताऱ्याला धाडले असणार हेही उघड आहे. त्यामुळेच दबक्या आवाजात का होईना, राष्ट्रवादीच्या गोटातून चिंतेचाच सूर ऐकू येत आहे.