लुटारू टोळीतील आणखी एक जाळ्यात

By Admin | Updated: October 30, 2015 23:29 IST2015-10-30T23:28:09+5:302015-10-30T23:29:41+5:30

शिरवळ पोलिसांचे यश : ट्रक चालकांना लुटण्याचे अनेक गुन्हे उघड होणे शक्य

Another gang of robber gangs | लुटारू टोळीतील आणखी एक जाळ्यात

लुटारू टोळीतील आणखी एक जाळ्यात

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचालकांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील आणखी एक आरोपीला अटक करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. किरण पांडुरंग डावारे ( वय १९, रा. उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दरम्यान, खंडाळा न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (दि. २) पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी यापूर्वी पुणे येथील टोळीमधील एकाला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. १६ सप्टेंबरला झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील सुनील झेंडे हे रत्नागिरीहून फिनोलेक्स पावडरचा माल भरुन तळेगाव दाभाडे येथे मालट्रकमधून निघाले होते. यावेळी झेंडे हे शिरवळजवळील एका पेट्रोल पंपावर थांबले होते. पहाटे पाचच्या सुमारास झेंडे शौचविधीकरिता गेले असता अज्ञात तिघांनी झेंडे यांना चाकूचा धाक दाखवत खिशातील एक हजार रुपये, मालट्रकमधील नऊ हजार रुपये व मोबाईल घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी यापूर्वी टोळीमधील संशयित दीपक सुरेश यादव (वय १९, रा. तरवडेवस्ती, महंमदवाडी, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या दीपक यादव हा न्यायालयीन कोठडीत असून अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात आहे.
या लूटमारीतील टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, शिरवळ पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पोपटराव कदम तपास करीत आहेत. महामार्गावरील ट्रकचालकांना लुटण्याच्या घटना जिल्ह्यात वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Another gang of robber gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.