आणखी एक मद्यपी चालक घरी!
By Admin | Updated: October 16, 2014 00:07 IST2014-10-15T22:59:32+5:302014-10-16T00:07:32+5:30
विभाग नियंत्रकांची कारवाई : दारू पिऊन प्रवाशासी घातली होती हुज्जत

आणखी एक मद्यपी चालक घरी!
सातारा : दारू पिऊन एसटी वेडीवाकडी चालविल्यामुळे मेढा आगारातील चालकाला निलंबित केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवार, दि. १४ रोजी सातारा आगारातील आणखी एका तळीराम चालकाला निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले. यामुळे एसटी विभागातील चालक-वाहकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालविणे गैर आहे. पण, आजवर फारशा कारवाया झाल्याचे समोर येत नव्हते. मद्यपान करण्याने संबंधित चालकाच्या आरोग्याला धोक्याचे आहेच; पण त्याहीपेक्षा एसटी बसमध्ये बसलेले पन्नास प्रवासी व रस्त्यावरून निघालेल्या असंख्य वाटसरूंच्या दृष्टीने जीवघेणा ठरू शकते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या साताराचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी कडक पावले उचलली आहेत.
मेढा आगारातील चालक नितीन मोरे याला तीनच दिवसांपूर्वी निलंबित केले होते. त्याचवेळी भविष्यात कोणी मद्यपान केल्याचे आढळल्यास त्याला निलंबित केले जाईल, त्याचप्रमाणे त्याला कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही कारवाईचा इशारा विभाग नियंत्रक थोरात यांनी दिला होता.
अशीच घटना सोमवारीही घडली. सातारा आगारातील चालक प्रदीप जनार्दन जाधव (रा. मर्ढे, ता. सातारा व हल्ली रा. रामनगर, सातारा) हे अंबेदरे येथून सातारा आगारात सोमवार, दि. १३ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आले होते.
या प्रवासादरम्यान जाधवने मद्यपान केले होते. या नशेत त्याने एका प्रवाशासी हुज्जत घातली होती. त्यामुळे चिडलेल्या प्रवाशाने वाहतूक नियंत्रक कक्षात येऊन संबंधित चालकाविरोधात तक्रार दिली. त्यानुसार त्याची वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले. पण, गर्दीचा फायदा घेऊन जाधव पळून गेला. त्याचा अनेकवेळा शोध घेऊनही तो सापडला नाही.
याप्रकरणी विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव थोरात यांच्याशी संपर्क साधला असता रात्री साडेदहाच्या सुमारास पोलीस व एसटी अधिकाऱ्यांनी रामनगर येथील जाधव याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी वैद्यकीय तपासणी केली आहे. जाधव याला शुक्रवार, दि. १७ रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
मद्यपान करून बस चालविली तसेच प्रवाशांची हुज्जत घातल्याच्या कारणावरून सातारा आगारातील वरिष्ठ आगार व्यवस्थापक एस. एम. कांबळे यांनी विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांच्या आदेशानुसार निलंबनाची कारवाई केली. (प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षकांनी घातले लक्ष
जाधव याला वैद्यकीय तपासणीसाठी सातारा बसस्थानकातील पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, तेथून जाधव पळून गेला. यासंदर्भात एसटीचे अधिकारी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती करत होते. मात्र, पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. एसटीच्या अधिकाऱ्यांना शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाण्याकडे पाठविले जात होते. त्यानंतर विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधला. अधीक्षक देशमुख यांनी स्वत: लक्ष घातल्यानंतर साडेदहाच्या सुमारास जाधवला राहत्या घरातून ताब्यात घेतले.
आगारातून गाडी नेल्यानंतर आपण काहीही करू शकतो, असा समज चालक-वाहकांचा असेल, तर तो खपवून घेतला जाणार नाही. मेढा आगारापाठोपाठ सातारा आगारातील चालकालाही मद्यपान करून वाहन चालविल्याच्या कारणावरून निलंबित करत आहे. भविष्यातही कोणाचीही गय केली जाणार नाही. मद्यपी चालकाला मदत केल्यास आगार व्यवस्थापकापासून वाहकापर्यंत असे तीन ते चार जणांवर कारवाई केली जाईल.
- धनाजी थोरात,
विभाग नियंत्रक, सातारा.