9स्पटेंबर १९४२ लढ्यात हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चामध्ये सहभागी झालेले दिवंगत श्रीरंग राऊत यांचे चिरंजीव म्हणून तालुक्यात ओळख असलेले प्रमोद ऊर्फ बंडा श्रीरंग राऊत यांनी प्रगतशील शेतकरी म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे. दुष्काळ पाचवीला पुजलेल्या वडूज भागातील पाणीटंचाईवर त्यांनी जालीम उपाय शोधून काढला आहे. आंतरपिके घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यावर त्यांनी भर दिला आहे. वडूजच्या दूरसंचार कार्यालयात कार्यरत असलेल्या बंडा राऊत यांना वडिलार्जित जमिनीत नोकरी सांभाळत उर्वरित काळात त्यांना शेतीची आवड आहे. विहिरीला कमी पाणी असल्याने बागायती शेती करताना त्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते.वडूज येथील कुंभारकी नावाच्या शिवारात दीड एकर क्षेत्रामध्ये आजअखेर पाण्यावर अवलंबून जमेल तसे धान्यच पिकविले जात होते; परंतु नोकरीनिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर इतर ठिकाणची कमी पाण्यातील शेती आणि त्या शेतकऱ्यांचे कष्ट पाहून आपणही प्रयत्न करावेत, असा मनाशी चंग बांधला. जमिनीत सहा विंधन विहिरी घेऊन जलवाहिनी केली. ते पाणी विहिरीत सोडले. यामुळे साडेसहा परूस विहीर पाण्याने तुडुंब भरली आहे. दिवसभर नोकरी सांभाळत रात्रीच्या वेळी पिकांना पाणी पाजण्याचे काम ते करीत असतात. कांदा पिकाअंतर्गत देशी मुळ्याची लागण त्यांनी केली आहे. मुळ्याचे वजन सुमारे किलोच्या आसपास असून, लांबीलाही तो मुळा जादा आहे. त्याचबरोबरीने हरभरा, चवळी अशी पिके घेऊन त्यांनी कमी पाण्यात आंतरपिकाला जादा महत्त्व दिले. त्यामुळे उत्पन्न ही जादा मिळत आहे. उत्पन्नापेक्षा शेती कशी केली आहे, हे दाखविण्यासाठी ते प्रत्येक मित्रांना बरोबर घेऊन शेती दाखवित आहेत. मित्र आणि त्यांच्यासोबत आलेल्या प्रत्येकाला ते हरभरा, चवळी आणि मुळा देऊन दुष्काळातील शेतकऱ्यांची दानत ही व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या दिलखुलास स्वभावामुळे आणि नोकरी सांभाळत केलेले शेतीतील कष्टाचे परिसरातून कौतुक होत आहे. टेलिफोन खात्यातील नोकरी पार्टटाईम करून शेतीला फुलटाईम जॉब अपॉर्च्युनिटी म्हणून तर पाहत नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.शेखर जाधव
ही रानवाट वेगळी...दूरध्वनी खात्यातील नोकरी शेतीपूर्वी बनली पार्टटाईम
By admin | Updated: March 7, 2016 00:30 IST