अंनिसची फसवी विज्ञानविरोधी जनजागरण व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:41+5:302021-05-11T04:41:41+5:30
सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने ''फसव्या विज्ञानविरोधात जनजागरण मोहीम'' राबवली जाणार आहे. त्याचाच एक ...

अंनिसची फसवी विज्ञानविरोधी जनजागरण व्याख्यानमाला
सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वतीने ''फसव्या विज्ञानविरोधात जनजागरण मोहीम'' राबवली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ११ ते १४ मे रोजी चारदिवसीय ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. ही सर्व व्याख्याने दररोज सायं. ५ वाजता ऑनलाइन पद्धतीने होतील.
सध्या समाजात विज्ञानाच्या नावाने अनेक अशास्त्रीय प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांवर होणारे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर सोसावे लागत आहेत.
या प्रकारच्या फसव्या विज्ञाना (स्यूडो सायन्स) विरोधातील लढाई हा अंनिस चळवळीचा पुढील अजेंडा होणार आहे, त्यामुळे या विषयासंदर्भात कार्यकर्ते व जनतेचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
यामध्ये पहिल्या दिवशी, मंगळवार ११ मे रोजी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या ''छद्मविज्ञानविरोधी विशेषांकाचे प्रकाशन'' आयसर पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ यांच्या हस्ते होईल, या प्रसंगी डॉ. रथ हे ''फसवे विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन'' या विषयावर व्याख्यान देतील.
दुसऱ्या दिवशी, बुधवार, १२ मे रोजी छद्मविज्ञानाचे अभ्यासक प्रा. प.रा. आर्डे (सांगली) हे '' फसव्या विज्ञानाचा ऑक्टोपस'' या विषयावर बोलतील.
तिसऱ्या दिवशी, गुरुवार, १३ मे रोजी वाई येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व विज्ञान लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर हे ''छद्मवैद्यक : फसव्या उपचारांचे मायाजाल'' या विषयावर बोलतील.
चौथ्या दिवशी शुक्रवार, १४ मे रोजी मनोविकारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांच्या भाषणाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. या प्रसंगी ते ''लोक फसव्या विज्ञानाला का भुलतात?'' या विषयावर मार्गदर्शन करतील.
या सर्व व्याख्यानांचे लाइव्ह प्रसारण मॅक्स महाराष्ट्र तसेच नरेंद्र दाभोलकर थॉट्स, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या फेसबुक पेजेसवर होईल.
तरी, सर्वांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राद्वारे प्रशांत पोतदार यांनी केले आहे.