चारा-पाण्याअभावी जनावरांची पोटं खपाटाला

By Admin | Updated: April 12, 2016 00:43 IST2016-04-11T22:36:32+5:302016-04-12T00:43:25+5:30

माण तालुक्यातील चित्र : पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही चारा छावण्या सुरु नाहीत

The animal's stomach powdered due to fodder-water | चारा-पाण्याअभावी जनावरांची पोटं खपाटाला

चारा-पाण्याअभावी जनावरांची पोटं खपाटाला

म्हसवड : माण तालुक्यातील काही भागात प्रचंड चारा-पाणीटंचाई जाणवू लागली आहे. चारापाण्याअभावी जनावरांचे मोठे हाल होत आहेत. जनावरं जगविण्यासाठी पशुपालकांची धडपड सुरू आहे. ओला चारा मिळणे दुरापास्त झाले आहे. जनावरांची पोटं खपाटाला चालली आहेत. पालकमंत्र्यांनी मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश देऊनही चारा छावण्या सुरू होत नाहीत. त्यामुळे पुढील दोन महिने जनावरे कशी जगवायची, हा प्रश्न पशुपालकांसमोर आहे.
माण तहसील कार्यालयाकडे जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याचे प्रस्ताव गेल्या एक महिन्यापासून धूळखात पडून आहेत. या प्रस्तावावर लक्ष देण्यास प्रशासनाकडे वेळ नाही. पालकमंत्र्यांनी डीपीडीसीच्या बैठकीत दुष्काळी भागातून चारा छावणी मागणीचे प्रस्ताव आल्यास चारा छावण्या सुरू कराव्यात असे जाहीर करून अनेक दिवस उलटले तरी माणमध्ये अद्याप चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. प्रशासनाने तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)

दुष्काळ निवारणाच्या सुविधा कधी मिळणार?
शासनाने माण तालुक्यातील १०६ गावे दुष्काळी जाहीर केली खरी; पण नागरिकांना दुष्काळ निवारणाच्या सुविधा मात्र अद्याप सुरू केल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले, पण हाताला रोजगार, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. शिंगणापूर पाणीयोजना तातडीने सुरू केल्यास तालुक्यातील निम्म्या भागाचा पाणीप्रश्न सुटेल.
३९ टँकरच्या मदतीने दुष्काळाशी लढा
सध्या माण तालुक्यातील उत्तर भागात शेतकरी दुष्काळाशी मुकाबला देत आहेत. तालुक्यातील ५६ हजार ४०५ नागरिक, ८९ हजार ३७४ जनावरे ३९ टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. माणच्या पूर्व व उत्तर भागात पाच दिवस पुरेल एवढा चारा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढील काळात जनावरांना पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध न झाल्यास जनावरे विकण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

Web Title: The animal's stomach powdered due to fodder-water