घरामागच्या पन्नास फूट खोल बोअरवेलमध्ये श्वानाचं पिल्लू पडलं. त्याच्या ओरडण्याचा आवाज आजूबाजूला घुमत होता. त्या आवाजामुळे लोक गोळा झाले. त्याला बाहेर कसं काढायचं? बर काढलं तर ते जिवंत राहावं, असे अनेक प्रश्न होते. साताऱ्यातील श्वानप्रेमी राजूभाई राजपुरोहित यांनी अत्यंत कुशलतेने हे पिल्लू बोअरच्या बाहेर काढलं आणि त्याच्यावर शास्त्रशुद्ध उपचार करून त्याला जिवंत ठेवलं. मरणाच्या दारातून परतलेले पिल्लू त्याच्या डोळ्यांच्या भावनांमधून थँक्स म्हणत होतं, ते राजूभाईंनाच समजलं...
साताऱ्यात राजपुरोहित स्वीट्स प्रसिद्ध आहे. व्यवसाय म्हटलं की पूर्णवेळ यासाठी देणं आलं. घरातला परंपरागत व्यवसाय वाढवत ठेवणं हे राजपुरोहित बंधूंनी कायमच जपलेलं व्रत आहे. मात्र, व्यवसायासोबतच प्राण्यांवरची माया राजूभाईंना चैन पडू देत नव्हती. राजस्थानमध्ये त्यांच्या मामांकडे घोडी, श्वान असे प्राणी पाळले होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना प्राण्यांविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आहे.
सातारा शहरात भटक्या प्राण्यांच्या हालअपेष्टा पाहून आणि त्यांच्यामुळे सामान्य सातारकरांना होणारा त्रास लक्षात घेऊन राजूभाईंनी कामाला सुरुवात केली. डॉ. हेमलता हावरे यापूर्वी प्राण्यांसाठी एक संस्था चालवत होत्या, त्यांच्यासोबत त्यांनी काम सुरू केले, त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. तसेच अनुभवदेखील मिळाला. पुढे त्यांनी ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट सुरू केला. तत्कालीन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरहिरे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहिले. अनेक निवृत्त पशुसंवर्धन अधिकारीदेखील या संस्थेशी जोडले गेले. सातारकरांना होत असलेला भटक्या जनावरांचा त्रास लक्षात घेऊन सद्बुद्धी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आठ वर्षांपूर्वी निर्बिजीकरण मोहीम राबवली. यामध्ये तब्बल १ हजार श्वानांचे त्यांनी निर्बिजीकरण करून घेतले. साताऱ्यातील दूध संघाच्या जागेमध्ये त्यांना संस्थेसाठी जागा मिळाली होती. पुढे हा दवाखानादेखील बंद झाला. मात्र, त्यांचे काम थांबले नाही. ॲनिमल राहत या संस्थेच्या कामातदेखील त्यांनी झोकून दिले आहे.
रस्त्यावर फिरणारे भटके श्वान, गाढवे जखमी अवस्थेत आढळल्यास त्यांच्यावर उपचार करण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता जनावरांवर उपचार करणे किंवा निर्बिजीकरण या गोष्टी अत्यंत काटेकोरपणे कराव्या लागतात तसेच स्थानिक शासकीय संस्थेलाच उपचार किंवा निर्बिजीकरण मोहीम राबविण्याचे अधिकार आहेत. आठ वर्षांपूर्वी राबवलेल्या मोहिमेमुळे पुढे दोन वर्ष सातार्यात रेबीजचा रुग्ण आढळला नाही आणि भटक्या श्वानांमुळे कुणाला त्रासदेखील झाला नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये ही मोहीम रखडली आहे. नगरपालिकेला केंद्र शासनाचा निधी येत असला तरीदेखील नगरपालिका याबाबत आपलेपणाने कुठलीही मोहीम राबविताना दिसत नाही. राजूभाई राजपुरोहित यांचा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. साताऱ्यामध्ये भटक्या श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. साताऱ्यातील जनता श्वानांच्या हल्ल्यामुळे त्रस्त आहे. पहाटे फिरायला जाणारे लोक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात श्वानांचे हल्ले होत आहेत. मात्र, नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने राजूभाईंनी निवेदने सादर करून नगरपालिकेला जाग आणण्याचे काम केले आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उपचार करण्याचे साहित्य खरेदी करायला हवे. साताऱ्यातील राजवाडा परिसरात असणारा जनावरांचा दवाखाना या मोहिमेसाठी सुरू करावा, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मोकाट जनावरांवर उपचार करण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, त्यांना साहित्य देण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे.
कोट..
सातारा नगरपालिकेने आता गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. शहराची हद्दवाढ झाली असल्याने आता मोठा परिसर सातारा शहराच्या हद्दीत येणार आहे आणि श्वानांचा त्रासदेखील भविष्यात वाढू शकतो, हे लक्षात घेऊन नगरपालिकेने व्यापक प्रमाणात निर्बिजीकरणाची मोहीम राबविणे गरजेचे आहे.
- राजूभाई राजपुरोहित
चौकट...
आणि श्वानांचे जीव वाचले...
सातारा शहरातील कन्या शाळेच्या मागील बाजूला एक ओढा आहे. या ओढ्यामध्ये काही लोक कबुतरे पकडण्याचा उद्योग करत होते. त्यांनी लावलेल्या फासात कबूतर अडकून ओढ्यात पडायचे आणि त्याठिकाणी श्वान गोळा व्हायचे. या श्वानांनी कबूतर खाऊ नये, म्हणून संबंधितांनी तारांचे कुंपण लावलेले होते. या तारांमध्ये अडकून श्वान जखमी व्हायचे. अनेकदा त्यांना गॅंग्रिनदेखील झाला. याबाबत राजूभाईनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसात तक्रार केल्यानंतर हा प्रकार थांबला आणि जखमी श्वानांवर उपचारदेखील केले.
- सागर गुजर
आर्टिकलला फोटो आहे