मकरंद-बाबाराजेंची नाराजी; शिंदेची चाणक्यनीती

By Admin | Updated: September 22, 2014 00:48 IST2014-09-22T00:46:54+5:302014-09-22T00:48:25+5:30

जिल्हा परिषद : ‘किंगमेकर’ रामराजेंनी साधली विधानसभा निवडणुकीची गणिते

Anger of Makrand-Babarazzi; Shinde's Chanakyaaniti | मकरंद-बाबाराजेंची नाराजी; शिंदेची चाणक्यनीती

मकरंद-बाबाराजेंची नाराजी; शिंदेची चाणक्यनीती

सातारा : राष्ट्रवादी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपणच ‘किंगमेकर’ असल्याचे दाखवून दिले तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या दबावतंत्राचा आधार घेत पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनीही उपाध्यक्ष निवडीत आपली ‘चाणक्यनिती’ दाखवत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला राजकीय तह यशस्वी करून दाखविला.मात्र, आ. शिवेंद्रराजे भोसले आणि आ. मकरंद पाटील हे पूर्णपणे नाराज झाले.
रामराजेंनी फलटण विधानसभा मतदारसंघ तर मंत्री शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतांच्या बेरजेचे गणित मांडले आहे. त्याचा आधार घेत फलटणमधून माणिकराव सोनवलकर यांना अध्यक्ष तर साताऱ्यातून रवी साळुंखे यांना उपाध्यक्षदावर काम करण्याची संधी दिली. मात्र, या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना दोघांनाही राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या आगपाखडीलाही सामोरे जावे लागले, ही बाब नाकारता येणार नाही.
पहिल्या टप्प्यात सकाळी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीला मंत्री शिंदे, रामराजे, आ. प्रभाकर घार्गे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आदी उपस्थित होते. यावेळीही पदे कोणाला द्यायची या अनुषंगाने चर्चा झाली. मकरंद पाटील यांनी दोन्ही पदांची मागणी केली. मात्र, तसे होत नसेलतर दोन्ही पैकी एक पद आम्हाला द्याच, असे सांगितले. तर शिवेंद्रसिंहराजेंनीही अमित कदम यांच्यासाठी मागणी केली. मात्र, यापैकी कोणाचीही मागणी मान्य होत नसल्याचे लक्षात येताच दोघेही नाराज झाले. परिणामी येथील बैठक संपल्यानंतर मकरंद पाटील आणि शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्वच राष्ट्रवादी भवनात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी भवनात सुरू झालेली बैठक आणि अगदी दोन्ही निवडी होईपर्यंत घडलेल्या अडीच तासांच्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या तोंडचे पाणी तर पळालेच त्याचबरोबर चेहऱ्यावरील तणावही लपून राहिला नाही. अगोदरच मंत्री शिंदे यांना शिवाजीराव शिंदे यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. त्यातचच काँग्रेसनेही निवडणुकीसाठी अर्ज भरल्यामुळे रामराजेंच्या चेहऱ्यावरही तणावाच्या रेषा दिसू लागल्या.
दगाफटका बसू नये म्हणून काय करावे लागेल, यासाठी विचारमंथन सुरू झाले. राष्ट्रवादी भवनातून जिल्हा परिषद सदस्यांचा नाराजीनामा सुरू झाल्यानंतर यावर पडदा टाकण्यासाठी रामराजे आणि मंत्री शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले. त्यातच शिवाजीराव शिंदे आणि अमित कदम या दोघांनीही अर्ज भरले असून दोघेही एकमेकांच्या अर्जांना सूचक असल्याची माहिती मिळाली. यानंतर रामराजे, शिंदे यांनी आ. प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि म्हसवडचे युवराज सुर्यवंशी यांना तत्काळ या दोघांची समजूत काढण्यासाठी पाठविले. नाराज मंडळी अमित कदम यांच्या निवासस्थानी असल्याचे समजल्यानंतर हे तिघेही तेथे गेले आणि त्यांची समजूत काढण्यात गुंतले. मात्र, तरीही काहीएक फायदा झाला नाही. मंत्री शिंदे यांनी आपल्याला अमितच्या चुलत्यांशी बोलावे लागेल, असे रामराजेंना सुचविले. थोड्याचवेळात मंत्री शिंदे यांच्या मोबाईल वाजला आणि त्यांनी बोलणे सुरू झाले आणि ‘अमितला समजावून सांगा. त्याला राजकीय भवितव्य असल्यामुळे त्यांने असा निर्णय घेऊ नको म्हणून सांगा,’ असे सांगत होते. थोड्याव वेळात येथे समजूत काढायला गेलेले आ. घार्गे आणि माने आले. मात्र, त्यांचेही ऐकले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मंत्री शिंदे यांनी थेट जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थान गाठले आणि येथे प्रत्येक सदस्यांची भेट घेतली. त्याचबरोबर व्हीप काढण्यात आला असल्यामुळे कोणीही दगाफटका करू नका, असे बजावले.
जिल्हा परिषदेत निवड प्रक्रिया सुरू झाली आणि रामराजे, मंत्री शिंदे, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. घार्गे, माने यांनी राष्ट्रवादी भवनातच थांबणे पसंत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Anger of Makrand-Babarazzi; Shinde's Chanakyaaniti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.