अंगापूरची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:37 IST2021-08-29T04:37:14+5:302021-08-29T04:37:14+5:30
अंगापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही ग्रामसभांना अडचणी आल्या. दरम्यानच्या काळात पंचवार्षिक निवडणुका होऊन सत्ता समीकरणे बदलली. त्यामुळे ...

अंगापूरची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात
अंगापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही ग्रामसभांना अडचणी आल्या. दरम्यानच्या काळात पंचवार्षिक निवडणुका होऊन सत्ता समीकरणे बदलली. त्यामुळे ग्रामसभेला महत्त्व प्राप्त झाले होते. नेहमीच विकासाच्या मुद्यावरून वादाची होणारी ग्रामसभा यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विषय पत्रिकेवरील विविध विषयांवरील ठरावाला चर्चेद्वारे एकमताने मंजुरी देत विकासाच्या गतीला एकीचे साथ आली.
सरपंच वर्षा कणसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपसरपंच हणमंत कणसे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी दीपक देशमुख, जयसिंग कणसे, संतोष कणसे, सुभाष जाधव, बबन ढाणे, हणमंतराव कणसे, धोंडिराम कणसे, विविध शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
कोविड नियमांचे पालन करून गणेश हाॅल येथे पार पडलेल्या सभेत ग्रामविकास अधिकारी देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर मागील प्रोसिडिंग वाचन करून ठरावाद्वारे कायम करण्यात आले. विषयपत्रिकेचे वाचन करून विविध शासकीय खात्यांचा आढावा घेण्यात आला. विविध शासकीय योजनेस पात्र लाभार्थ्यांची तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेस पात्र लाभार्थ्यांची निवड करून मान्यता देण्यात आली. कोरोना उपाययोजनाबाबत चर्चा करण्यात आली. गावठाण क्षेत्रात सौरकृषी वाहिनी जागा संपादन करण्याबाबत चर्चा करून मान्यता देण्यात आली. तसेच १४ व १५ वित्त आयोग कामाचा आढावा घेण्यात आला. या सभेत विविध विषयांना उपस्थितांनी मंजुरी देऊन एकमुखी ठराव मंजूर करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र नलवडे यांनी आभार मानले.
चौकटः
तंटामुक्त समितीची एकमुखी निवड
या ग्रामसभेत तटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी दादासाहेब कणसे तर उपाध्यक्षपदी गणपत कणसे तसेच समितीच्या सदस्यपदी विविध क्षेत्रातील मान्यवरांची एकमुखी निवड करण्यात आली.
२८अंगापूर
अंगापूर वंदन येथील गणेश हाॅलमध्ये पार पडलेल्या ग्रामसभेस ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.