अंगणवाडी सेवकांकडून भूस्खलनग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:44 IST2021-08-20T04:44:45+5:302021-08-20T04:44:45+5:30
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तालुक्यातील भूस्खलन व पूरग्रस्त भागातील पीडितांना लोकसहभागातून ...

अंगणवाडी सेवकांकडून भूस्खलनग्रस्तांना मदत
चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तालुक्यातील भूस्खलन व पूरग्रस्त भागातील पीडितांना लोकसहभागातून मदत गोळा करीत प्रत्यक्ष गावात जाऊन गरजूंपर्यंत ती मदत पोहोच केली. अंगणवाडीच्या सुपरवायझर सीमा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील अंगणवाडी सेविकांनी राबविलेला हा उपक्रम आपदग्रस्तांना नवचैतन्य देणारा ठरला आहे.
चाफळ विभागात २२ गावे व २३ वाड्यावस्त्यांचा समावेश आहे. दुर्गम डोंगरदऱ्याखोऱ्यांत संपूर्ण विभाग विखुरलेला आहे. विभागात प्रत्येक वाडीवस्त्यांवर ५२ अंगणवाड्या आहेत. ५२ अंगणवाड्यांत ५२ सेविका व ३८ मदतनीस कार्यरत आहेत. पाटण खोऱ्यात भूस्खलन व पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावेच्या गावे गाडली गेली. त्यात अनेकजणांना जीव गमवावा लागला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. या बिकट परिस्थितीत एक मायेचा आधार देत या आपदग्रस्तांना यातून सावरण्यासाठी चाफळ विभागातील अंगणवाडी वीट एक व दोनच्या रणरागिणींनी एकीच्या बळावर गावागावांतून जमेल ती मदत घरोघरी जाऊन जमा केली व सामाजिक बांधिलकी जोपासत ती मदत प्रत्यक्षात आपदग्रस्तांच्या घरी दारात जाऊन हातात दिली.
चौकट :
तालुक्यातील कामरगाव, कोडोली, चाफेर, मिरगाव, सुतारवाडी, आंबेघर, भोकरवाडीसह अन्य १० गावांतील सुमारे ८०० आपदग्रस्तांना अन्नधान्य किट, साड्या, कपडे, गृहोपयोगी साहित्य मदत म्हणून घरात जाऊन दिले. यावेळी सुपरवायझर सीमा कांबळे, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, कलावती पाटील, शोभा चव्हाण, वनिता पाटील, नीलम साळुंखे, शितोळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कदम उपस्थित होते.
चौकट :
आपल्या तालुक्यातील एका भागातील आपलेच लोक अडचणी असल्याचे पाहून चाफळ विभाग त्यांच्या मदतीला धावला गेला. अंगणवाडी सेविकांच्या या उपक्रमाला विभागातील प्रत्येक गावातील दानशूर व्यक्तींनी जमेल ती मदत देत आपदग्रस्त बांधवांना एक मायेचा आधार दिला. त्यामुळे अजूनही समाजात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय यावेळी सेविकांना अनुभवावयास आला.