जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा होणार गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:57+5:302021-09-23T04:44:57+5:30
सातारा : कोरोना संकट काळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व ...

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचा होणार गौरव
सातारा : कोरोना संकट काळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समिती मासिक सभेत घेण्यात आला. दरम्यान, यावेळी महिलांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सभापती सोनाली पोळ यांनी दिली.
जिल्हा परिषदेत महिला व बालविकास विभागाची मासिक सभा झाली. सभापती पोळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, समितीच्या सदस्या सुनीता कदम, दीपाली साळुंखे, कमल जाधव, कांचन निंबाळकर, सुनीता कचरे, शामबाला घोडके आदी सदस्या उपस्थित होत्या.
महिला व बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील १८ विभागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना गौरविण्यात येते. मात्र, मागील दीड वर्षांपासून जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संकट आहे. त्यामुळे सेविका व मदतनीसांचा गौरव समारंभ झाला नव्हता. या पुरस्कारांचे वितरण करण्याची मागणी होत होती. त्यानुसार लवकरच सेविका व मदतनीसांचा गौरव समारंभ होणार असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने १८ ते ४० वयोगटातील युवती आणि महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक महिलांना योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. याबाबतच्या विविध योजनांसाठी प्रस्ताव आले आहेत. लवकरच लाभार्थी निवड करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी ढवळे यांनी दिली.
....................................................