कोरोनाच्या कठीण प्रसंगातही अंगणवाडी ताईंचे काम कौतूकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST2021-03-20T04:38:38+5:302021-03-20T04:38:38+5:30
खटाव : बालकांवर आईनंतर संस्कार करण्याचे पहिली पायरी म्हणून अंगणवाड्यांकडे पाहिले जाते. बालकांबरोबरच किशोरवयीन मुली, गरोदर माता याच्या ...

कोरोनाच्या कठीण प्रसंगातही अंगणवाडी ताईंचे काम कौतूकास्पद
खटाव : बालकांवर आईनंतर संस्कार करण्याचे पहिली पायरी म्हणून अंगणवाड्यांकडे पाहिले जाते. बालकांबरोबरच किशोरवयीन मुली, गरोदर माता याच्या आहाराविषयी जागरूक असणाऱ्या अंगणवाडीताईंचे कोरोनाच्या काळातील काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रिया शिंदे यांनी केले.
खटावमध्ये ग्रामपंचायत सभागृहात कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत सातारा जिल्हा परिषद एकात्मिक बालविकास सेवा योजनांतर्गत खटाव पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पोषण पंधरवडा कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच नंदकुमार वायदंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण उदमले, विस्ताराधिकारी व्ही. आर. केजळे, राजन पाटील, संगीता शिंदे, संगीत काकडे उपस्थित होते.
शिंदे म्हणाल्या, ‘यावेळी कोरोनाच्या कठीण प्रसंगातही आशा सेविका तसेच वैद्यकीय कर्मचारी यांच्या सोबत राहून घरोघरी जाऊन सहकार्य केले आहे. तसेच कोरोनाची तमा न बाळगता बालकांच्या व मातांच्या घरोघरी आहार पोहोचवला. त्याचबरोबर कोरोनामुक्त महाराष्ट्रसाठी शासनाची ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जाऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अंगणवाडीताईंचे काम कौतुकास्पद आहे.’
दिनांक १६ ते ३१ मार्च हा पंधरवडा पोषण पंधरवडा म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. याच अनुषंगाने खटावसह बीटमधील खातगुण, भाडेवाडी, विसापूरमधील अंगणवाड्यांच्यावतीने सामुदायिक जनजागृतीपर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक अंगणवाडीत कोरोनाच्या या परिस्थितीतही लाभार्थ्यांना कोरोनाचे नियम पाळून योग्य ती खबरदारी घेत माहिती व जनजागृतीचा उपक्रम घेतला जात आहे. याच कार्यक्रमाची माहिती सामुदायिकरित्या मांडण्यात आलेल्या प्रदर्शनामधून दिली जाते. यामध्ये आहारविषयक, मुलीच्या जन्माचे स्वागत, गरोदर मातेचे ओटीभरण, स्वच्छता संदेश, स्त्रीभ्रूण हत्या, बेटी बचाओ बेटी पढाओचे रांगोळीच्या माध्यमातून, तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून योग्यरित्या प्रदर्शन मांडण्यात आले होते.
फोटो १९खटाव-अंगणवाडी
खटाव येथे अंगणवाडीच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरविण्यात आले होते. (छाया : नम्रता भोसले)