... आणि सामान्यांची सायकल पंक्चर झाली!
By Admin | Updated: May 25, 2015 00:39 IST2015-05-24T21:51:19+5:302015-05-25T00:39:47+5:30
खरेदीचे प्रमाण घटले : व्यावसायिक शोधू लागला दुसरा व्यवसाय

... आणि सामान्यांची सायकल पंक्चर झाली!
परळी : शाळांना सुटी लागली की, सायकलच्या दुकानात खरेदी किंवा दुरुस्तीसाठी गर्दी व्हायची, तसेच सायकल दुकानमध्येदेखील सायकली भाड्याने घेण्यासाठी मुलांची रीघ लागायची. मात्र, आजच्या यांत्रिकीकरणामुळे सायकल चालविणे ही बाब कालबाह्य होत चालली आहे. अगदी पाच-सहा वर्षांपूर्वी सायकल चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. पंरतु हे दृश्य आता दुर्मिळ झाले आहे. यामुळे बालचमूंसाठी सायकल सवारीची धमाल अनुभवणे हे स्वप्नवतच होत आहे.
बालचमूंसाठी सध्या सायकल शिकण्यासाठी एकही हक्काची जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यातच टी.व्ही., कॉम्प्युटर व मोबाईलमधील गेम्स् त्यांच्या मनावर अधिराज्य करीत असल्याचे दृश्य घराघरातून पाहायला मिळते. तसेच आई-वडीलही आपल्या मुलांची उन्हातान्हात सायकल चालवून किंवा शारीरिक दमछाक होणारे खेळ खेळण्यापेक्षा त्यांच्या हातात मोबाईल सोपवतात. त्यामुळे सायकलच्या दुकानांमध्ये चिमुकल्यांची पावले आता वळत नाहीत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी लहान अथवा मोठ्यांमध्ये सायकल खरेदी करण्याची ऐक वेगळीच क्रेझ होती. सुटीच्या काळात परिसरातील मैदानात सायकल शिकणाऱ्यांची गर्दी व्हायची. सायकल शिकताना बालचमूंना वाटणारी भीती तसेच मोठ्यांची होणारी तारांबळ त्याचबरोबर सायकल येत नाही म्हणून चिडवणारा मित्रवर्ग हे दृश्य आता कालबाह्य झाले आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सायकल दुकानांची संख्या उरली आहे. सायकल खरेदी व दुरुस्तीचे प्रमाण घटल्याने या संबंधित व्यावसायिक इतर व्यवसायाकडे वळत आहेत. (वार्ताहर)
सायकल शिकण्यापासून दूरच...
याांंत्रिकीकरणामुळे वाहनांची स्वस्त झालेली किंमत, त्याचबरोबर वाढत्या वाहतुकींमुळे पालकही मुलांना सायकल चालविण्यात परवानगी देत नाहीत. यातच रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने धावणारी वाहने, कॉम्प्युटरवर बसल्याठिकाणी उपलब्ध होत असलेल्या गेममुळे विद्यार्थी दशेतील मुले-मुली सायकल शिकण्यापासून दूरच राहात आहेत.
लहान मुलांमध्ये क्रेझ
लहान मुलांमध्ये आजही सायकलची ओढ असल्याने छोट्या सायकलची दुकाने अजूनही टिकून आहेत. यामध्ये चायना आणि गिअरच्या सायकलींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. चायना सायकली दिसण्यास आकर्षक आहेत. बाजारात सायकलींची क्रेझच आहे.
सध्या यांत्रिकीकरणाचे युग असल्याने चुकून एखादी सायकल सध्या रस्त्यावर किंवा दुकानात दुरुस्तीसाठी येत आहे. सायकल खरेदीचे प्रमाण घटले असून, पूर्वी परीक्षा संपल्या की दुकानात दुरुस्ती व खरेदीसाठी गर्दी होत असायची; मात्र सध्या दुसरा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.
-इसूब पटेल, व्यावसायिक,
गजवडी, ता. सातारा