...अन् बापू ड्रायव्हरचा बंगला झाला कौतुकाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:29+5:302021-09-12T04:44:29+5:30
चोराडे येथील ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी बापूराव कृष्णा पिसाळ ऊर्फ बापू ड्रायव्हर वीस वर्षांपासून उसाची लागवड करीत आहेत. पाडेगाव ...

...अन् बापू ड्रायव्हरचा बंगला झाला कौतुकाचा
चोराडे येथील ऊस उत्पादक प्रगतशील शेतकरी बापूराव कृष्णा पिसाळ ऊर्फ बापू ड्रायव्हर वीस वर्षांपासून उसाची लागवड करीत आहेत. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने १९९६ मध्ये प्रसारित केलेल्या को ८६ ० ३२ या उसाच्या वाणाने त्यांची चांगलीच प्रगती झाली. दरवर्षी त्यांचा चार ते पाच एकर उसामध्ये अंदाजे चारशे ते साडेचारशे टनापेक्षा अधिक उत्पादन मिळते. दुष्काळी खटाव तालुक्यात विहीर बागायती क्षेत्रावरती ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे सुनियोजन, सुयोग्य सेंद्रिय खतांचा वापर आणि बियाण्यासाठी को ८६ ० ३२ वाणाच्या विश्वासार्हतेमुळे बापूराव पिसाळ यांना एकरी सरासरी ९० टनांपेक्षा जास्त उतार मिळत आहे. संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने त्यांनी आपल्या घरातील मुलांच्या लग्नाचा खर्च, तसेच विहीर व शेती दुरुस्तीसाठीचा खर्च याचे नियोजन करून सुमारे दीड हजार स्क्वेअर फुटाचा टुमदार बंगला शेतामध्ये बांधला आहे.
बंगल्याला दिलेल्या हटके नावामुळे परिसरात व सोशल मीडियाद्वारे झालेल्या प्रचंड लाइकद्वारे खटाव येथील कृषी विभाग व ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, श्रीकांत पिसाळ, अप्पासाहेब पिसाळ, अभिजित पिसाळ, मच्छिंद्रनाथ पिसाळ, विजय पिसाळ, नवनाथ पिसाळ, कृष्णा पिसाळ यांनी पिसाळ यांचा शाल, श्रीफळ, फेटा, ऊस मार्गदर्शन पुस्तिका व विद्यापीठाची कृषी दैनंदिनी देऊन नुकताच सत्कार केला.
लेखक
-राजू पिसाळ, पुसेसावळी
चौकट
भिंतीवरही उसाचे चित्र
त्यांची ऊस पिकाबाबतची निष्ठा, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बंगल्यास ज्या ऊस उत्पादनामुळे प्रगती झाली त्या उसाच्या वाणाचे ‘को- ८६ ० ३२ ची कृपा’ असे नाव दिले आहे, तसेच बंगल्यावर उसाची चित्रेही रेखाटलेली आहेत.
कोट :
प्रतिकूल परिस्थितीत केलेले नियोजन, प्रामाणिक कष्ट आणि उसावरील निस्सीम प्रेम यामुळेच बंगला बांधण्याचे स्वप्न पूर्ण झाले. म्हणूनच ‘८६ ० ३२ ची कृपा’ हा आम्ही केलेला योग्य सन्मान अभिमानास्पदच आहे.
-बापूराव पिसाळ,
ऊस उत्पादक शेतकरी, चोराडे
फोटो
११राजीव पिसाळ
चोराडे येथील शेतकरी बापूराव पिसाळ यांनी शेतात बांधलेल्या बंगल्याला उसाच्या जातीचे नाव दिले आहे.