अॅम्ब्युलन्स नेली सहलीला!
By Admin | Updated: October 11, 2015 00:08 IST2015-10-11T00:02:48+5:302015-10-11T00:08:00+5:30
पाटणच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा प्रताप : कास पठारावर म्हणे दर्शनाला गेलो होतो

अॅम्ब्युलन्स नेली सहलीला!
अरुण पवार / पाटण
पाटण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी यांच्यातील गजब कहाण्यांचे अजब कारनामे दिवसेंदिवस समोर येत असून, शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयाची सहल चक्क कास पठाराच्या दर्शनाला गेल्याचे उघड झाले आहे. मग कास पठार बघायचे झाल्यास खिशाला चाट नको म्हणून रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला.
पाटण ग्रामीण रुग्णालयात सध्या वैद्यकीय अधीक्षक विरुद्ध कर्मचारी असे युद्ध सुरू आहे. मग वैद्यकीय अधीक्षक हटावसाठी कर्मचाऱ्यांनी उपोषणे, वरिष्ठ स्तरावर तक्रारी केल्या, त्याची चौकशीही झाली. असे असताना रुग्णवाहिकेतून कास पठाराचे दर्शन घेणे या नियमबाह्य आणि धाडसी मोहिमेचे बिंग फुटणार याची वैद्यकीय अधीक्षक यांना साधी जाणीव होऊ नये. त्याहीपुढे जाऊन काही ठराविक कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कास पठाराची चढाई केली. तर उर्वरित कर्मचारी आपले पाय ओढल्याशिवाय राहतील का? बरं असो; परंतु रुग्णवाहिका ही फक्त आणि फक्त रुग्णांची ने-आण करण्यासाठीच वापरायची असते.
त्वरित सेवेसाठी रुग्णवाहिकेला जाईल तिथे वाट करून दिली जाते. मग काही रुग्णवाहिका कास पठारावर गेल्यावर तेथील पर्यटकांनी तोंडात बोटे घातली नसतील तर नवलच. दुसरीकडे पाटण ग्रामीण रुग्णालयात मेंढोशी येथील एक अत्यवस्थ रुग्ण पुढील उपचारााठी तडफडत होता. त्यास पुणे येथे हलविण्यासाठी रुग्णवाहिका हवी होती आणि दुसरीकडे कास पठाराची भ्रमंती करण्यास रुग्णवाहिकेचा झालेला वापर ही बाब निश्चित संवेदनशील असून, कास पठाराची सहल पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापनात महागात पडणार असे दिसते. कारण या सहलीचे प्रत्यक्ष साक्षीदारच भंडाफोड करण्याची शक्यता आहे.