शहरात आंबेडकरप्रेमींचा मोर्चा
By Admin | Updated: June 10, 2014 02:15 IST2014-06-10T01:34:15+5:302014-06-10T02:15:29+5:30
साताऱ्यात कडकडीत बंद : दोन ठिकाणी किरकोळ बाचाबाची

शहरात आंबेडकरप्रेमींचा मोर्चा
सातारा : आंबेडकरप्रेमींनी साताऱ्यात पुकारलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असलातरी ‘रिपाइं’चे तीन स्वतंत्र निषेध मोर्चे निघाले. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचेही प्रकार घडले. मात्र, प्रमुख कार्यकर्त्यांनी सावरून घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक ठिकाणी सामुदायिक बुध्दवंदना घेण्याबरोबरच मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून महापुरुषांची अवमानकारक छायाचित्रे पोस्ट केल्यानंतर त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. सातारा शहरातही सोमवारी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात ‘रिपाइं’चे तीन निषेध मोर्चे निघाले आणि त्यांची सांगता मातोश्री भीमाबाई आंबेडकर स्मारकास अभिवादन करून झाली.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशारे तपासे, नवनाथ शिंदे, अण्णा वायदंडे, सचिन वायदंडे, अजिंक्य तपासे, मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नऊ वाजता आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले आणि निषेध मोर्चाला सुरूवात केली. हा मोर्चा राजपथमार्गे राजवाडा आणि येथून खालच्या रस्त्याने पोवईनाका मार्गे सदर बझार येथे आला. साडेदहाच्या दरम्यान ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शरद गायकवाड, वैभव गायकवाड, नंदू जावळे आणि सहकाऱ्यांचा निषेध मोर्चा आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून सुरू झाला.
तपासे आणि गायकवाड यांचा निषेध मोर्चा सुरू असताना ‘रिपाइं’चे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, विशाल डोकेफोडे, विलास कांबळे, जय रणदिवे, सिध्दू सणगीर, अनिल कांबळे, दत्तू ओव्हाळ, महादेव कांबळे आणि सहकाऱ्यांनी बाँबे रेस्टॉरंट येथून निषेध मोर्चा सुरू केला. आंबेडकर पुतळा परिसरात आल्यानंतर येथे अभिवादन झाले आणि मोर्चा पुढे निघाला आणि मातोश्री भीमाबाई आंबेडकर स्मारक येथे सांगता झाली.
सातारा बसस्थानक परिसरात असणाऱ्या मंडईत एका व्यापाऱ्याने आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. याचवेळी येथून जाणाऱ्या आंबेडकरप्रेमी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तेथे धाव घेत वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात विविध ठिकाणी शांततेत बंद पाळला.
तरडगावमध्ये बंद
तरडगाव, ता. फलटण येथे या घटनेच्या निषेधार्थ दुपारपर्यंत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी आठवडी बाजार असतो. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी दुपारपर्यंतच बंद पाळण्यात आला. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वरकुटे-मलवडी येथे निषेध फेरी
वरकुटे-मलवडी : आक्षेपार्ह छायाचित्राच्या निषेधार्थ वरकुटे-मलवडी येथे ग्रामस्थ व सर्व संघटनांच्या वतीने गावातून शांततेच्या मार्गाने निषेध फेरी काढून बंद पाळण्यात आला.
यावेळी बापूराव बनगर, रवींद्र आटपाडकर, दादासाहेब काळेल यांनी मनोगत व्यक्त केले. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रा. दीपक जगताप, विवेक आटपाडकर यांनी केली. निषेध फेरीत भारत बनसोडे, अशोक केंगार, बाबासाहेब मंडले, महावीर काटकर, दत्ता चव्हाण, शंकर तोरणे, दत्ता बनसोडे, बापू बनसोडे, संजय चव्हाण, सुभाष जगताप, बाबा सरतापे, अमोल यादव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)