आंबेडकरप्रेमींनी दाखविला संयम
By Admin | Updated: June 9, 2014 01:16 IST2014-06-09T01:16:35+5:302014-06-09T01:16:52+5:30
सातारा जिल्हा : सोशल मीडियावर पुन्हा महापुरुषाचा अवमान, ठिकठिकाणी निषेध

आंबेडकरप्रेमींनी दाखविला संयम
सातारा : सोशल मीडियावर पुन्हा एकदा महापुरुषाचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकून अवमान केल्याचा प्रकार घडला. या घटनेचे पडसाद रविवारी जिल्ह्यात उमटले. सातारा, कोरेगाव, वडूज, फलटण, जावळी, कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर येथे आंबेडकरप्रेमींनी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. तसेच अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला.
सातारा शहरात ‘रिपाइं’च्या वतीने निषेध फेरी काढली. यामध्ये दादासाहेब ओव्हाळ, पार्थ पोळके, चंद्रकांत खंडाईत, दयानंद माने, प्रवीण धस्के, संदीप कांबळे, नीलेश भिसे तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोवई नाका येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला.
सातारा शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजीव मुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राजीव मुटाणे व रवींद्र पिसाळ यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, सोमवारी सातारा बंद करणार असून या बंदला प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले. या बैठकीस किशोर तपासे, संदीप शिंदे, नवनाथ शिंदे, नेताजी इंगवले, विकास बुरुंगले, रवींद्र बाबर, संजय शिंदे, बाबा शिंदे, आशिष पोळ, धनेश खुडे, अशोक गायकवाड, शरद गायकवाड उपस्थित होते.
दहिवडीत कडकडीत बंद
दहिवडी : या घटनेच्या निषेधार्थ दहिवडी येथे शांततापूर्ण वातावरणात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर दुकाने बंद ठेवून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
वडूज येथे मूक मोर्चा
वडूज : महापुरुषाच्या अवमानप्रकरणी खटाव तालुका ‘आरपीआय’च्या वतीने शहरातून मूक मोर्चा काढून निवासी नायब तहसीलदार एम. के. बेबले यांना संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अजित नलावडे कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी शरद गायकवाड, सुनील मिसाळ, कृणाल गडांकुश, निखिल खरात, रवींद्र झेंडे, देवानंद मिसाळ, राहुल सातपुते, उज्ज्वला मिसाळ, मुक्ताबाई मिसाळ, महेंद्र रायबोले, शंकर वायदंडे, किसन मिसाळ, अजित रायबोले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
तरडगावमध्ये आज बंद
तरडगाव : या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी सात ते दुपारी चारपर्यंत तरडगावमध्ये बंद पुकारण्यात आला आहे.
या बंदमध्ये सर्व व्यापारी वर्ग, दुकानदार यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन निवेदनाद्वारे करण्यात आले. (प्रतिनिधी)