अंबवडे गणात सत्ताधाऱ्यांचे पानिपत; काँग्रेसला ‘दे धक्का’
By Admin | Updated: August 12, 2015 20:48 IST2015-08-12T20:48:53+5:302015-08-12T20:48:53+5:30
अंबवडे (सं) वाघोली, आरबवाडी, रेवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर

अंबवडे गणात सत्ताधाऱ्यांचे पानिपत; काँग्रेसला ‘दे धक्का’
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील अंबवडे (सं) वाघोली या पंचायत समिती गणातील एकूण सहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश सकुंडे यांच्या अंबवडे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत सत्ता परिवर्तन केले. या गणात रेवडी, अंबवडे या दोन ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असतानाही त्यांना या निवडणुकीत हार पत्कारावी लागली.
आरबवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी अंतर्गत दोन गटांत रंगतदार झाली. माजी पंचायत समिती सदस्या वंदना भिलारे, राष्ट्रवादीचे नाना भिलारे, संदीप भोसले यांचे वर्चस्व असलेल्या या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे तानाजी गोळे, एल. आर. भोसले यांनी सात ही जागा स्व:ताकडे घेत सत्ताधाऱ्याला धक्का दिला.
रेवडी ग्रामपंचायतीची काँग्रेसचे सुनील भोसले यांच्याकडे सत्ता होती. या ग्रामपंचयतीत राष्ट्रवादीने पाच जागा जिंकत परिवर्तन घडवले. राष्ट्रवादीसाठी धनसिंग शिंदे, अरुण मोरे, गजानन मोरे यांनी परिश्रम घेतले.
दुधनवाडी ग्रामपंचायतीत पोपट दिघे यांचे वर्चस्व होते. त्यांना राष्ट्रवादीच्याच सुरेश निकम यांनी चार जागा घेऊन शह देत परिवर्तन घडवले आहे.
भक्तवडी ग्रामपंचायतीत सात जागांसाठी तिरंगी लढत झाली. यामध्ये सर्वपक्षीय एकत्र येऊन ही निवडणूक लढली गेली.
कोलवडी ग्रामपंचायतीत कल्याण भोसले यांनी सत्ता कायम ठेवत सात जागांवर राष्ट्रीवादानेच विजय संपादन केला. तर विरोधी विष्णुपंत भोसले यांना दोन जागा मिळाल्या.
अंबवडे (सं) वाघोली ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश सकुंडे यांची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीचे नीलेश जगदाळे व नवनाथ सकुंडे यांनी एकूण नऊ पैकी सात जागावर विजय संपादन करीत सत्तांतर घडवले. तालुक्यातील तांबी ग्रामपंचायतीत मात्र भगवा फडकला. (वार्ताहर)