तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST2021-02-07T04:36:58+5:302021-02-07T04:36:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : समाजातील महत्त्वपूर्ण आणि तितकाच दुर्लक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांची गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड सुरू आहे. ...

तृतीयपंथीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम कटिबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : समाजातील महत्त्वपूर्ण आणि तितकाच दुर्लक्षित घटक म्हणून तृतीयपंथीयांची गेल्या अनेक वर्षांपासून हेळसांड सुरू आहे. त्यांच्या जगण्याला संविधानाने मान्यता दिलीये आता त्यांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळ कटिबद्ध राहील, अशी ग्वाही महामंडळच्या सदस्या अॅड. दिलशाद मुजावर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण निर्देशीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संग्राम संस्था, क्षितीज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था आणि जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीयांच्या कायदेविषयक समस्या आणि उपाय या विषयावर अॅड. मुजावर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव होते. यावेळी संग्रामचे प्रकल्प अधिकारी शशिकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जैन सोशल ग्रुपच्या गीता मामणिया, अॅड. मनीषा बर्गे, अॅड. माधुरी प्रभूणे, अॅड. सुचित्रा काटकर, प्रा. जीवन बोराटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना प्रशांत वारकर म्हणाले, ‘प्रत्येक जाती धर्माचे आणि प्रांताचे लोक तृतीयपंथीय म्हणून आमच्या समाजात येतात, त्यामुळे आम्ही सगळे खरे भारतीय आहोत. तृतीयंपथीयांच्या नावाने कमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या समाजात असणारी गुरू चेला ही पद्धत बंद होणं आवश्यक आहे. ज्येष्ठ तृतीयपंथीयांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळावा.’
अध्यक्षीय मनोगतात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव म्हणाले, ‘कुठल्या चांगल्या कार्यक्रमात ज्यांचे आशीर्वाद लागतात, त्यांना समाजात अजूनही मान्यता मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्त्री-पुरुष यांच्यासारखंच तृतीयपंथी हा सुद्धा समाजाचा घटक आहे हे कायद्याला मान्य आहे. पण, या सर्वांसाठी न्याय व्यवस्था खंबीरपणे कार्यरत आहे.
या कार्यक्रमास प्रा. संध्या चौगुले, अॅड. शुभांगी दळवी यांच्यासह मान्यवर आणि तृतीयपंथी उपस्थित होते.
चौकट :
हाताला काम, राहायला घर यासाठी प्रयत्नशील
तृतीयपंथी म्हणून कोणीही जन्माला येत नाही. वयात येताना होणारे बदल लक्षात घेतल्यानंतर तृतीयपंथी असल्याचं कोणी सांगितलं तर कुटुंबीय आक्रमक होतात. अनेकांना तर घरातूनही बाहेर काढलं जातं. या सगळ्यांसाठी राहायला घर आणि हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन यावेळी उपस्थित संस्था प्रतिनिधींनी दिले.