प्रसंग ओढावतोय बाका तरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:43 IST2021-08-25T04:43:01+5:302021-08-25T04:43:01+5:30

सागर चव्हाण लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री : तीन दिवसांपूर्वी साताऱ्यातील तरुणीचा एकीव धबधब्याजवळ दगडावरून पाय घसरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू ...

Although the incident is dragging on | प्रसंग ओढावतोय बाका तरी

प्रसंग ओढावतोय बाका तरी

सागर चव्हाण

लोकमत न्यूज नेटवर्क

पेट्री : तीन दिवसांपूर्वी साताऱ्यातील तरुणीचा एकीव धबधब्याजवळ दगडावरून पाय घसरून पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर येथून पुढे तरी एकीव धबधब्यावर पर्यटकांना सुविधा उपलब्ध होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कास परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. फुलांसाठी प्रसिद्ध कास पठार, कास तलाव, वजराई धबधबा, सह्याद्रीनगरच्या पवनचक्क्या, कोयनादर्शन पॉइंट आणि हल्ली पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला एकीव गावातील पाबळ नावाचा धबधबा. वजराई धबधबा असो की ठोसेघरचा धबधबा, बहुतांशी धबधब्याचे दर्शन लांबूनच होते. मात्र, पर्यटकांना हल्ली धबधबा पाहण्याबरोबरच त्यामध्ये भिजण्याचा आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे दोन-तीन वर्षांपासून एकीवला पर्यटकांची चांगलीच गर्दी होऊ लागली आहे.

पर्यटनस्थळ म्हणून एकीव धबधबा उदयास येत असताना, येथील धबधब्याचा परिसर पाहिला, तर सुविधांची वानवा दिसते. सातारा-एकीव-सह्याद्रीनगर या रस्त्यावर एकीव गावच्या अगदी जवळ रस्त्याच्या वरच्या बाजूला हा धबधबा आहे. धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अगदी छोटीशी पायवाट आहे. झाडेझुडपे, दगडातून वाट काढत कड्यावरून पाणी पडणाऱ्या ठिकाणी जावे लागते. या ठिकाणी जाणे खूपच धोकादायक आहे. सातत्यपूर्ण पावसामुळे सर्व दगड शेवाळून गेले आहेत. त्यामुळे घसराघसरी कायम होते. त्यात सेल्फी आणि फोटोसेशनच्या नादात धोकादायक ठिकाणी पर्यटक जातात आणि अपघातांना निमंत्रण मिळते. साताऱ्यातील युवतीच्या बाबतीतही असाच प्रकार घडल्याने तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. अशा घटना घडू नये व सुरक्षित पर्यटन व्हावे, यासाठी प्रयत्नांची गरज आहे.

(चौकट)

... तर अपघात टळतील

स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी एकीव धबधबा स्थळाचा आराखडा बनवून पर्यटकांना धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या, प्रेक्षागॅलरी, रेलिंग, कठडे, सुरक्षाव्यवस्था आदी सुविधा उपलब्ध देणे गरजेचे आहे. असे केल्यास भविष्यातील असे अपघात टाळता येतील, असे ग्रामस्थांचे मत आहे.

(कोट)

शासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी आम्हीही सतर्क राहू. संयुक्त वनव्यवस्थापन समिती एकीवच्या माध्यमातून धबधबा स्थळ विकासासाठी प्रयत्न करू.

- बजरंग कदम, ग्रामस्थ, एकीव

फोटो : २४ एकीव वॉटरफॉल

एकीव धबधब्याजवळ एका तरुणाची दगडावरून पाय घसरून मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना अनेक पर्यटक धोकादायक पत्करून येथे फोटोसेशन करताना दिसत आहेत. (छाया : सागर चव्हाण)

Web Title: Although the incident is dragging on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.