ग्रामीण भागात मान्सूनपूर्व कामांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:32+5:302021-06-04T04:29:32+5:30
वरकुटे-मलवडी : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने माण तालुक्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी ...

ग्रामीण भागात मान्सूनपूर्व कामांची लगबग
वरकुटे-मलवडी : मान्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने माण तालुक्यातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व कामांची लगबग वाढली आहे. घराच्या डागडुजीसाठी प्लास्टिक कागद, ताडपत्री, जनावरांसाठी वैरण भरण्याच्या कामाची घाई बळीराजा करताना दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ जूनपर्यंत मान्सून केरळहून पुढे सरकणार आहे. त्यामुळे काही दिवसातच देशासह महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची मान्सूनपूर्व कामांची धांदल सुरू झाली आहे.
माण पूर्व भागातील बहुतांश शेतकऱ्यांची घरे धाब्याची असून, घरावर माती-कराल असल्याने, पावसाळ्यात ही घरे गळण्याची शक्यता असते. म्हणून आच्छादनासाठी, तर जनावरांचा चारा-कडबा पावसाने खराब होऊ नये म्हणून शेतकरी विविध प्रकारच्या प्लास्टिक कागदाचा वापर करतात. मागील आठवड्यात जिल्ह्यातील बहुतेक भागांना तौक्ते चक्रीवादळातील सोसाट्याचा वारा, वादळ आणि जोरदार पावसाने तडाखा दिल्याने, नागरिकांमध्ये कामांची चढाओढ सुरू झाली आहे. घरांवर आच्छादन टाकण्यासाठी प्लास्टिक कागद, ताडपत्री खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक लाॅकडाऊनमुळे बंद असलेल्या दुकानाचे दरवाजे ठोठावत आहेत.
पाऊस येण्यापूर्वी वेळेत घरांची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. डागडुजीच्या कामांना विलंब न करणे सोईस्कर ठरेल, यासाठी ही कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. पावसाळ्यात जनावरांचा चारा-कडबा भिजू नये म्हणून जनावरांच्या गोठ्यांची ताडपत्रीच्या सहाय्याने डागडुजी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. काही ठिकाणी जुन्या घरांच्या दुरुस्तीचे काम नागरिकांनी हाती घेतले आहे. गळत असलेल्या ठिकाणांवर प्लास्टिक कागदाचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात कांदा, मिरची साठवणूक करण्यासाठीही लगबग दिसून येत आहे. पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी आपापली राहती घरे, जनावरांंसाठी चारा, जनावरांचे गोठे, गोवऱ्या, वाळलेले सरपण आदींची सुरक्षित ठिकाणी सोय करण्याची लगबग मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
चौकट :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लाॅकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यात काही ठिकाणी खरेदीसाठी सूट मिळताच शेतकऱ्यांसह गरजू नागरिक दुकानात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. पावसाळा तोंडावर आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दुकानदारांनी प्लास्टिक कागद, ताडपत्री, पत्रे यांच्या किमती वाढविल्याने त्याचाही आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांच्याच माथी मारला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीसुद्धा ‘आलिया भोगासी असावे सादर...’ म्हणत जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि घर दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन मुकाट्याने आपलं दुरुस्तीचे काम करण्याची लगबग सर्वत्र सुरु असल्याचे चित्र आहे.
फोटो : ०३वरकुटे-मलवडी
वरकुटे-मलवडी भागात घरांची डागडुजी करण्याच्या कामाला वेग आला आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)