खटाव परिसरात कांदा काढणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:25+5:302021-02-13T04:38:25+5:30
खटाव : खटावसह परिसरात सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे. कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते आणि याच ...

खटाव परिसरात कांदा काढणीची लगबग
खटाव : खटावसह परिसरात सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे. कांदा पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते आणि याच कांद्याला सध्या दर आला असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग दिसून येत आहे.
कांद्याला बाजारात प्रति क्विंटल २७०० ते ३५०० रुपये असा उच्च दर मिळत असल्याने तसेच घाऊक बाजारात हाच कांदा ४० ते ४५ रुपये किलोने विकला जात आहे. दरवेळी कांद्याला मिळणारा भाव पाहता, या वेळेस दर चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
आगाप कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांची आता कांदा काढण्याची घाई दिसून येत आहे. पावसामुळे सुरुवातीला बहुतांशी शेतकऱ्यांची रोपे वाया गेली. त्यामुळे दोन-तीन वेळा कांद्याचे बी टाकूनही ते म्हणावे तसे उगवून आले नाही. तसेच कांदा लागवडीनंतर यावेळी आलेला पाऊस, दूषित हवामानामुळे कांद्यावर पडलेल्या रोगामुळे उगवून आलेल्या कांद्याच्या रोपांची जोपासना करण्यासाठी शेतकऱ्यांना मेहनत करावी लागली होती. या सर्व परिस्थितीवर मात करत ज्या शेतकऱ्यांनी कांदा पीक घेतले आहे, त्यांना चांगले उत्पादनही निघत आहे आणि या परिस्थितीत समाधानकारक भावही मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व फायदा होत आहे. कांदा काढणीनंतर चालू बाजारभावाच्या दरात घसरण होईल, तसेच नवीन कांद्याची बाजारात आवक वाढल्यानंतर कांद्याचे दर उतरतील, या शंकेमुळे कांदा काढणीनंतर लगेचच काढलेला कांदा खरेदीसाठी व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर दिसून येत आहेत.
कांदा नगदी पीक आहे. याला दर चांगला मिळाला, तरच लागवडीनंतर झालेल्या खर्चाचा ताळमेळ बसतो.
(कोट..)
आगाप कांद्याच्या लागणीनंतर हवामानात बराच चढ-उतार झाला. उगवून आलेल्या रोपांना जगवण्यासाठी बरीच मेहनत व कसरत करावी लागली. वेळच्या वेळी योग्य औषध फवारणी केली. आज कांद्याला मिळणाऱ्या दरामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आर्थिक परिस्थितीवर मात करता येईल.
- राजेंद्र भोसले, कांदा उत्पादक शेतकरी, खटाव
चौकट :
आता चोरट्यांची नजर कांद्यावर...
कांद्याला आता दर मिळत असल्याने शेतकऱ्याची कांदा काढण्याची घाई सुरू आहे. तर व्यापारी बांधावर येऊन कांदा पाहून जागेवरच कांद्याची खरेदी करत आहेत. कांद्याला दर असल्यामुळे चोरट्यांची नजर कांद्यावर पडत असल्यामुळे कांद्याची राखण करण्यासाठी शेतकऱ्यासह कुटुंबातील सदस्यांना शेतातच असल्या कडाक्याच्या थंडीत मुक्कामी राहावे लागत आहे.
१२खटाव कांदा
कॅप्शन : खटावसह परिसरात सध्या कांदा काढणीची लगबग सुरू आहे.