शिधापत्रिकेला आधार क्रमांक लिंकसाठी ग्राहकांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:47+5:302021-02-05T09:18:47+5:30
पिंपोडे बुद्रुक : केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकेद्वारे धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांना आपला आधार क्रमांक शिधापत्रिकेला लिंक करणे ...

शिधापत्रिकेला आधार क्रमांक लिंकसाठी ग्राहकांची लगबग
पिंपोडे बुद्रुक : केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकेद्वारे धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांना आपला आधार क्रमांक शिधापत्रिकेला लिंक करणे बंधनकारक केले आहे. शिधापत्रिकेला आधार क्रमांक लिंक न केल्यास एक फेब्रुवारीपासून शिधापत्रिकेद्वारे देण्यात येणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पुरवठा अधिकारी सुनील बोतालजी यांच्यामार्फत तहसीलदार अमोल कदम व नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांनी दिली असून मिळणारा लाभ खंडित होऊ नये, यासाठी ग्रामीण भागात शिधापत्रिकाधारकांची लगबग पाहावयास मिळत आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तालुक्यातील आधार कार्डशी शिधापत्रिका लिंक न झालेल्या लाभार्थ्यांची यादी दुकाननिहाय तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बहुतांशी लाभार्थ्यांचे आधार लिंक करणे प्रलंबित असून, त्या संबंधित लाभार्थ्यांनी त्वरित जवळच्या रास्त भाव दुकानदारांशी संपर्क साधून आधार लिंक करावे, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, ३१ जानेवारीपर्यंत संबंधित लाभार्थ्यांनी आधार व मोबाईल क्रमांक लिंक करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी पडताळणी व मोबाईल लिंक सुविधा प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात व परिमंडल कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी परिमंडल अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमोल कदम यांनी दिली आहे.
चौकट..
दुकानदारांना करावी लागतेय कसरत
बहुतांशी ठिकाणी शिधापत्रिकेत सामाविष्ट असलेले लाभार्थी हंगामी विविध कारणांनी बाहेरगावी वास्तव्यास आहेत. त्या लाभार्थ्यांचे आधार लिंक करून घेण्यासाठी शिधावाटप दुकानदारांना मोठी कसरत करावी लागत आहे.
चौकट..
कोरेगाव तालुक्यातील आधार लिंक संख्यानिहाय स्थिती..
लाभार्थी प्रकार शिधापत्रिका संख्या सामाविष्ट एकूण सदस्य संख्या आधार लिंक असलेले आधार लिंक नसलेले
१) अंत्योदय १७१३ ७३४२ ४९५८ २३८४
२) प्राधान्य लाभार्थी ३०, ३५१ १, ३०९७६ १०, ४४१० २६५६६