बांधकाम कामगारांना धनादेश वाटप
By Admin | Updated: January 21, 2015 23:53 IST2015-01-21T21:08:47+5:302015-01-21T23:53:55+5:30
शंकर पुजारी : कल्याणकारी मंडळातर्फे आयोजन

बांधकाम कामगारांना धनादेश वाटप
सिंधुदुर्गनगरी : निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सभासद असलेल्या बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून पाच लाखांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. एकूण १२६ धनादेश वाटप करण्यात आल्याची माहिती बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या हजारो सभासदांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी भवनावर मोर्चे, आंदोलने काढल्यामुळे अखेर हे पाच लाखांचे धनादेश प्राप्त झाले आहेत. अजूनही निवारा संघटनेने अर्ज केलेले ३० लाखांचे धनादेश निघावयाचे आहेत. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन व कामगार अधिकारी शेखर पाडगावकरांनी कामगारांसाठी परिश्रम घेतल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
१२६ धनादेशांचे वाटप या धनादेशामध्ये इंजिनिअर शिष्यवृत्ती ३५ हजारांचे दोन धनादेश, एका मृत कामगारासाठी ५ हजार, दरमहा पेन्शन १ हजार रुपयेप्रमाणे साठ महिने, प्रसूतीचे १० हजारांचे २ धनादेश, सिझरिंगचे १५ हजारांचे दोन धनादेश, विवाहासाठीचे १० हजारांचे ४ धनादेश, एम.एस.सी.आय.टी. शिष्यवृत्तीचे सर्व फीचे दोन धनादेश, कॉलेज शिष्यवृत्ती १५ हजारांचा १ धनादेश, अकरावी आणि बारावीचे ५ हजारांचे ३ धनादेश, आठवी ते दहावीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना २४०० रुपयांचे २९ धनादेश, पहिली ते सातवीचे १२०० रुपयांचे ६४ धनादेश व गंभीर आजारासाठी २५ हजारांचे दोन धनादेश, अशा एकूण ५ लाख ७ हजार ५०० रुपयांचा समावेश आहे. हे सर्व लाभ मिळण्यासाठी व अर्जाची पूर्तता करण्यासाठी युनियनचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी, जनरल सेक्रेटरी कॉ. विजय बचाटे, युनियनचे अध्यक्ष मंगेश नारिंग्रेकर, चंद्रप्रभा चव्हाण, सोनल नारिंगे्रेकर, मंगेश चव्हाण व निलिमा जाधव यांनी काम केले. धनादेश मिळालेल्या कामगारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)