आघाडी शासनाला मित्रपक्षाचाच जास्त त्रास
By Admin | Updated: March 7, 2016 00:20 IST2016-03-06T21:15:07+5:302016-03-07T00:20:16+5:30
पृथ्वीराज चव्हाण : राष्ट्रवादीचे नाव न घेता टीका; विरोध डावलून घेतले निर्णय, किशोर बाचल यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

आघाडी शासनाला मित्रपक्षाचाच जास्त त्रास
कोरेगाव : ‘राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असताना विरोधी पक्षाने जेवढा त्रास दिला नाही, तेवढा मित्रपक्षाने दिला. मित्र पक्षाचा विरोध डावलून मी मुख्यमंत्री या नात्याने शेतकरी व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले, त्यामध्ये राज्य बँकेचा निर्णय व सिंचनाचा महत्त्वाचा निर्णय होता,’ अशी प्रखर टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव न घेता केली.
किशोर बाचल यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश व त्यानिमित्त येथील बाजार मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम होते. आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, हिंदुराव नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष अॅड. विजयराव कणसे, अॅड. सुनीता जगताप, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बाबासाहेब कदम, भीमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या अर्चना बर्गे, अविनाश फाळके, मानाजीराव घाडगे, पोपटराव निकम, राजेंद्र शेलार, नंदकुमार निकम, नवनाथ केंजळे, संपतराव माने, रवींद्र माने, अॅड. जयवंतराव केंजळे, अॅड. प्रभाकर बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोरेगाव तालुक्यातील काँग्रेसला वैभवशाली परंपरा आहे. आता किशोर बाचल यांच्या प्रवेशामुळे पक्षसंघटना मजबूत झाली आहे. त्यांच्याकडे संघटन कौशल्य व समन्वयाची भूमिका असल्याने नजिकच्या काळात त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे नमूद करत माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आपल्या भाषणात केंद्रातील आणि राज्यातील भाजप युती सरकारांवर टीकेची तोफ डागली. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केवळ धूळफेक असून, कृषी क्षेत्रासाठी केवळ हजारो कोटींची तरतूद केली जात आहे, त्यामध्ये सुद्धा आकडेमोडीचा खेळ केला आहे. बुलेट ट्रेनसह रेल्वे आणि रस्त्यांच्या कामासाठी लाखो कोटींची तरतूद केली जाते, हा सर्वसामान्यांवर निश्चितपणे अन्याय आहे. जनतेला दिवास्वप्ने दाखवून भाजप सत्तेवर आला आहे, मात्र त्यांचे अच्छे दिन कोठे गेले, हे जनतेला कळून चुकले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
किशोर बाचल यांनी आपल्या भाषणात मात्र मोठ्या माणसांचे न ऐकल्याने काय होते, हे आज कळून चुकले असल्याचे सांगितले. राजकारणात माणसांकडून चुका होतात, माझ्याकडून झाल्या, त्यामुळे मी जनतेची माफी मागतो. राजकारणात स्थिरस्थावर झाल्यावर कार्यकर्ते संपविण्याची मोहीम सुरू झाली आहे. मीच २५ वर्षे आमदार राहणार, अशी भाषा सुरू झाली आहे. मूळ स्वभाव दिसू लागला असून, बघून घेण्याची भाषा केली जात आहे. आम्हीच आणले आणि आता आम्हीच नाद पूर्ण करू, असा इशारा देत बाचल यांनी ज्याप्रमाणे जनतेने ब्रिटिशांचे अन्यायकारक सायमन कमिशन घालविण्यासाठी ‘सायमन गो बॅक’ ची मोहीम सुरू केली होती, तशीच मोहीम आता मतदारसंघात सुरू केली जाणार आहे असल्याचे सांगताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी डॉ. पतंगराव कदम, सतेज पाटील, आनंदराव पाटील, अॅड. सुनीता जगताप, अर्चना बर्गे, भीमराव पाटील यांची भाषणे झाली.
अॅड. विजयराव कणसे यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. संतोष शेलार यांनी सूत्रसंचालन केले. शेखर चव्हाण यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पतंगरावांची दिलखुलास बॅटिंग....
डॉ. पतंगराव कदम यांनी भाषणामध्ये दिलखुलास बॅटिंग केली. जयकुमार गोरे यांच्याकडे अंगुली निर्देश करत डॉ. कदम यांनी तो आमदार कसा झाला, याचे उदाहरण दिले. त्यानंतर बाबांचे कौतुक करत त्यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना घेतलेल्या निर्णयांचे तोंडभरून कौतुक केले. काँग्रेस पक्षात अनेक वर्षे काम करत आहे, मंत्री म्हणून तब्बल आठ मुख्यमंत्र्यांबरोबर काम केले आहे. सर्वच मुख्यमंत्री होताना त्यांना पक्षीय पातळीवर सुचक म्हणून मीच होतो,’ असे सांगताच हशा पिकला. राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठवताना त्यांनी ‘येडीला सासर... माहेर ... सारखेच,’ असे सांगताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जिल्ह्याला फलटणकडून ग्रहण लागलेय
आ. जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा नामोल्लेख न करता, प्रचंड टीकेची झोड उठवली. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर बोलताना ‘फलटणकडून ग्रहण लागलेय,’ असे सांगितले. त्यांचा बंदोबस्त आता रणजितसिंह नाईक-निंबाळकरच करणार आहेत. ते सर्वजण मला माण-खटावमध्ये अडकून ठेवण्याचा दरवेळी प्रयत्न करतात, आता जयकुमार थांबणार नाही, जिल्ह्यातील प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यावर होणारा अन्याय रोखण्यासाठी हा जयकुमार बोलवाल तेव्हा येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दहिवडीत आलेला वाघ आणि मायणीतील कुस्तीचा विषय यावर त्यांनी भाष्य करताच कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या.
भाजप सरकारचे दुष्काळी पर्यटन : पृथ्वीराज चव्हाण
राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपचे मंत्री अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांकडून होणारी कोंडी लक्षात घेऊन दुष्काळी भागात दौरे काढू लागले आहेत. त्यांची ती पाहणी नसून, दुष्काळी पर्यटन आहे. सरकारमध्ये विचित्र अवस्था आहे. मुख्यमंत्री म्हणतात, ‘अधिकारी माझे ऐकत नाहीत, मंत्र्यांमंत्र्यांमध्ये वाद आहेत आणि मंत्र्यांचा स्वीय सहायक शेतकऱ्याला मारहाण करतोय,’ अशी टीका पृथ्वीराज चव्हाण
यांनी केली.