‘पशुवैद्यकीय’ला सर्पदंश लशीची ‘अॅलर्जी’ !
By Admin | Updated: December 5, 2014 23:37 IST2014-12-05T20:59:19+5:302014-12-05T23:37:36+5:30
जनावरे मरताहेत तडफडून : महाराष्ट्रात कुठेच लस नाही म्हणे..!

‘पशुवैद्यकीय’ला सर्पदंश लशीची ‘अॅलर्जी’ !
मणदुरे : सरकारी रूग्णालयामध्ये माणसांसाठी रेबीज तसेच सर्पदंशावरील अँटीस्रेक पेनम लस उपलब्ध आहे़ मात्र एखादे जनावर सर्पदंशाने बाधित असेल तर त्यासाठी सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सर्पदंशावरील लस महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नाही़ सर्पदंशाने येराड, ता़ पाटण येथील एका बैलाला नुकताच प्राण गमवावा लागला. या घटनेमुळे हे वास्तव उघड झाले आहे़
पाटण तालुका ह दुर्गम व डोंगराळ भाग आहे़ सर्पदंशाने जनावरे मृत्युमुखी पडल्याच्या घटना येथे घडल्या आहेत़ या आगोदर पाटण येथील ग्रामीण रूग्णालयातून लस मागवून जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत़ मात्र येराड येथील मारूती साळुंखे यांच्या बैलगाडीला जुंपलेल्या बैलांला सर्पदंश झाला़ त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून सर्पदंश झाल्याबद्दल सांगितले़ त्यानंतर तपासणी करताच, यासाठी सर्पदंशावरील लस आवश्यक असल्याचे सांगून स्वत: वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालय गाठले़ मात्र, माणसांसाठीची लस जनावरांसाठी उपयोगी नसल्याचे सांगण्यात आले़ अखेरीस लस उपलब्ध नसल्याने बैलाला प्राण गमवावे लागले़
या घटनेमुळे जनावरांच्या दवाखान्यात लस उपलब्ध करणे गरजेचे बनले आहे़ या आगोदरच्या घटनेत जनावरांना सर्पदंश झाल्यास पाटण येथील ग्रामिण रूग्णालयातून शेतकऱ्यांच्या पत्रानुसार पैसे भरून लस उपलब्ध केली जाऊन जनावरांचे प्राण वाचले होते़ मात्र, सध्या ग्रामीण रूग्णालयातच उपलब्धता कमी झाल्याने लस उपलब्ध होऊ शकली नाही़
पाटणसारख्या दुर्गम भागात ही लस उपलब्ध असणे गरजेचे आहे़ मात्र महाराष्ट्रात कुठेही सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्पदंशावरील तसेच कुत्र्याच्या चावण्यावरील रेबीज लस उपलब्ध नाही़ त्यामुळे ज्यांचे जीवन पशुधनावर अवलंबून आहे अशा अनेक कुटुंबांवर आर्थिक भार पडत असतो़
ही लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़ (वार्ताहर)
सर्व सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सर्पदंशावरील अॅन्टी स्रेक पेनम लस उपलब्ध असणे गरजेचे आहे़ सध्या तरी अशी लस महाराष्ट्रात कुठेही उपलब्ध नाही़
- डॉ़ एम़ बी़ चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी, पाटण
दवाखान्यात लस उपलब्ध नसल्याने बैलाचा मृत्यू झाला. अशी वेळ कोणावरही येऊ नये
- मारूती साळुंखे, बैलमालक शेतकरी, येराड
पाटण तालुक्यातील पशुधन
गायवर्ग - ३२०२६,
म्हैसवर्ग - ४९७२४,
शेळ्या - ३५६३०,
मेंढ्या १२०६१,
एकूण - १२०४४१