फलटणमध्ये झडताहेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:26+5:302021-03-23T04:41:26+5:30
फलटण पालिकेवर तीस वर्षांपासून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची एकहाती सत्ता आहे. सत्तेला शह देण्याचे प्रयत्न बऱ्याचवेळा विरोधकांनी केले. ...

फलटणमध्ये झडताहेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
फलटण पालिकेवर तीस वर्षांपासून विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची एकहाती सत्ता आहे. सत्तेला शह देण्याचे प्रयत्न बऱ्याचवेळा विरोधकांनी केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. निवडणुकीला सहा महिने बाकी असून त्या सत्ताधारी व विरोधी गटाच्या नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादीला सतरा, तर विरोधी राष्ट्रीय काँग्रेसला आठ जागा मिळाल्या होत्या. सध्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून काँग्रेसचे तत्कालीन नेते खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून खासदारकी मिळविली आहे. त्यामुळे काँग्रेसचे सर्व नगरसेवक भाजपचे झाले. मात्र विरोधी नगरसेवकांमध्येही बंडाळी आहे. स्वीकृत नगरसेवक सचिन बेडके यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादीअंतर्गत नगरसेवकांचे वेगवेगळे गट आहेत. पाच वर्षांमध्ये अनेक वेळा सत्ताधारी आणि विरोधक गटातील अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याचे बरेच प्रकार घडले आहेत. याचा फटका अनेक विकास कामांना बसला आहे.
रामराजेंनी मंजूर करून आणलेल्या महत्त्वाकांक्षी भुयारी गटार योजनेचे काम दोन वर्षापासून सुरू आहे. ही योजना चांगली असली तरी, या योजनेची कामे दर्जेदार होत नसल्याच्या तक्रारी दोन्ही बाजूकडून होत आहेत. भुयारी गटार योजनेचे काम लांबल्यामुळे शहरातील संपूर्ण रस्ते खराब झाले असून धुळीचा आणि खड्ड्यांचा प्रचंड त्रास जनतेला होत आहे. जनता त्यामुळे वैतागली आहे. शहरासाठी मुबलक पाणी असूनही वारंवार कृत्रिम पाणीटंचाईचा सामना जनतेला करावा लागत आहे. संकलित कराबाबतीत दिलासा देणे राष्ट्रवादीला जमलेले नाही.
रामराजे यांनी भरभरून दिले, मात्र सत्ताधारी नगरसेवक आणि प्रशासनाला ते व्यवस्थित घेऊन दर्जेदार कामे करता आली नाहीत. दुसरीकडे विरोधी पक्षालाही अनेकवेळा जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलने करता आलेली नाहीत. त्यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याने ठोस विरोध होताना दिसला नाही. त्यांनी विविध कामात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करूनही एकाही तक्रारीचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला नाही. यावरून विरोधक विकास कामात अडथळे आणत असल्याचा आरोप रामराजे यांनी केला होता. त्यावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी, कामे दर्जेदार होत नसल्याबद्दल आम्ही तक्रारी करत असल्याचे प्रत्युत्तर दिले होते.
चौकट
रामराजेंनी योजना आणल्या, पण निधीचा वापर करता येईना
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी पालिकेसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला, अनेक योजना आणल्या. मात्र निधीचा वापर सत्ताधारी गटाला व्यवस्थित करता आला नाही. रस्त्याची कामे अनेकवेळा झाली, मात्र ठराविक ठेकेदारालाच कामे मिळाली. त्याने दर्जेदार कामे न केल्याने वारंवार खड्डे पडले आहेत. निकृष्ट कामे करूनही त्याच ठेकेदाराला वारंवार कामे दिली जात असल्याबद्दल जनतेतूनही नाराजी व्यक्त होत आहे.