आरोप-प्रत्यारोपांनी जावळीतील वातावरण तापले
By Admin | Updated: April 27, 2015 00:11 IST2015-04-26T22:40:58+5:302015-04-27T00:11:06+5:30
जावळी बँक निवडणूक : संस्थापक सहकार पॅनेलचे विरोधकांसमोर कडवे आव्हान

आरोप-प्रत्यारोपांनी जावळीतील वातावरण तापले
कुडाळ : दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेची भि. दा. भिलारे गटाकडेच आत्तापर्यंत सत्ता राहिली आहे. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत कळंबे महाराजांच्या विचारांना मानणाऱ्या व बँकेच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या मंडळींना घेऊन विद्यमान अध्यक्ष योगेश गोळे यांनी संस्थापक सहकार पॅनेलच्या माध्यमातून भिलारे गटासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. त्यांच्या आव्हानाला तोंड देता येत नसल्यामुळेच भिलारे गटाकडून वैयक्तिक पातळीवर जाऊन आरोप-प्रत्यारोप केले जात असल्यामुळे जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.
सुरुवातीला बँक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरू असतानाच भिलारे गटातील काही इच्छुकांनी नेत्यांच्या आदेशापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे शेवटपर्यंत बिनविरोधची चर्चा असफल टळली. तर अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवसापूर्वीच भिलारे गटाने जनजागृती मेळाव्यांद्वारे प्रचारदेखील सुरू करीत विद्यमान अध्यक्षांवर आरोप करायला सुरुवात केल्याने बँक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले. परंतु गोळेंनी अर्ज माघारीपर्यंत आपण कोणतीही दिशा ठरवणार नाही, असे म्हणत संयम बाळगला.
करहर, मेढा मेळाव्यात भिलारे गटाकडून गोळे गटावर आरोप-प्रत्यारोप करीत घेरण्याचे काम करण्यात आले. अगदी वैयक्तिक टीका करून भिलारे गटातील नेत्यांनी मेळावे गाजवले. तर मेळाव्यांच्या व्यासपीठावर नेते, पदाधिकारी आणून आपली राजकीय शक्ती दाखवण्याचाच प्रयत्न केला. त्यांच्या प्रत्येक आरोपाला मेढा सभेत विद्यमान अध्यक्षांनी सुसंस्कृतपणे उत्तरे देत वैयक्तिक टीका टाळत केवळ बँकेच्या कामकाजाविषयी, प्रगतीविषयीच आपण बोलणार असल्याचे सांगत आपला राजकीय मुत्सुद्दीपणा दाखवला. दोन वर्षांत सर्वांना बरोबर घेऊन पाचशे कोटींवरून नऊशे कोटींच्या ठेवी गोळा करून बँकेचे भागभांडवल कसे वाढवले, तर यापुढे बँकेच्या कामकाजात काय सुधारणा करता येईल, ही संस्था नावारूपाला आणता येईल याचीच कल्पना त्यांनी सभासदांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
समतोल न राखल्याने भिलारे गटासमोर अडचणी
बँकेत खरी दुरंगी लढत होणार आहे. संस्थापक सहकार पॅनेलचे नेतृत्त्व अर्थ-शिक्षण समिती सभापती अमित कदम करीत आहेत. तर विरोधी भिलारे गटाच्या पॅनेलचे नेतृत्त्व माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे करीत आहेत. मात्र, त्यांच्या गटाकडून कोयना विभागात कोणाला संधी मिळाली नाही. तर अमित कदम व योगेश गोळे यांनी समतोल राखत कोयना विभागाला संधी देण्याबरोबरच लक्ष्मण धनावडे, अविनाश कारंजकर, यशवंतराव देशमुख, अरुण सुर्वे, सेवानिवृत्त व्यवस्थापक सूर्याजी विधाते, सी. वाय. पवार, ऋतुजा मांढरे या दिग्गजांना संधी देऊन भिलारे गटासमोर आव्हान उभे केले आहे.