सर्व सोयींनीयुक्त क्रीडा संकुल उभारणार
By Admin | Updated: January 10, 2015 00:13 IST2015-01-08T21:41:27+5:302015-01-10T00:13:33+5:30
नीतेश राणे : हरकुळ बुद्रुक येथील कार्यक्रमात आश्वासन

सर्व सोयींनीयुक्त क्रीडा संकुल उभारणार
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत. त्यांच्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी क्रीडांगणाबरोबरच अद्ययावत सुविधांची आवश्यकता आहे. त्यामुळे हरकुळ बुद्रुक येथे लवकरच सर्व सोयींनीयुक्त असे क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी दिले.
हरकुळ बुद्रुक येथे कणकवली तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, पंचायत समिती सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबा वर्देकर, सरपंच बंडू ठाकूर, उपसरपंच राजू पेडणेकर, बुलंद पटेल, गटविकास अधिकारी चंद्रसेन मकेश्वर, श्रिया सावंत, भाग्यलक्ष्मी साटम, मैथिली तेली, स्वरूपा विखाळे, अनुष्का रासम, बाळकृष्ण पेडणेकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडू घडविण्याची जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी. त्यांना विविध सुविधा पुरविण्याचे काम आम्ही निश्चितपणे करू. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपला वेगळा ठसा उमटविणे शक्य आहे. राज्य, राष्ट्र पातळीवर चमक दाखवून खेळाडूंनी आपल्या गावाबरोबरच तालुक्याचे नाव रोशन करावे. महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडूलकर, विश्वनाथन आनंद अशा खेळाडूंची नावे घेतल्यानंतर ते कुठल्या गावातील आहेत किंवा राज्यातील आहेत याचा उल्लेख आपण करतो. त्याच पद्धतीने आपल्याही यशानंतर गावाला आणि तालुक्याला नावलौकीक मिळेल, असा विश्वासही आमदार राणे यांनी व्यक्त केला. संदेश सावंत, सतीश सावंत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या महोत्सवाचा प्रारंभ मशाल प्रज्वलित करून करण्यात
आला. (वार्ताहर)