कुडाळच्या सरपंच निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST2021-02-06T05:14:12+5:302021-02-06T05:14:12+5:30

कुडाळ : जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सरपंच आरक्षणही जाहीर झाले. आता ८,९, १० फेब्रुवारी रोजी गावचा ...

All eyes are on the selection of the Sarpanch of Kudal | कुडाळच्या सरपंच निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष

कुडाळच्या सरपंच निवडीकडे साऱ्यांचेच लक्ष

कुडाळ : जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. सरपंच आरक्षणही जाहीर झाले. आता ८,९, १० फेब्रुवारी रोजी गावचा कारभारी निवडला जाणार आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या कुडाळच्या ग्रामपंचायतीत त्रिशंकू परिस्थिती असल्याने या ठिकाणी कोणाचा सरपंच होणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

जावळी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काही ठिकाणी बिनविरोध तर काही अंशतः निवडणुका लागल्या होत्या. गावचे सरपंच आरक्षणात जाहीर झाले, यात मात्र अनेकांचा हिरमोड झाला. आता पुढील आठवड्यात नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा होऊन सरपंचाची निवड होणार असल्याने बहुमत सिद्ध करण्याकरिता हालचाल होऊ लागली आहे.

ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे, अशा ग्रामपंचतीत खरी चुरस पाहायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी सरपंच आरक्षणाचा उमेदवार नसल्याने हे पद रिक्तच राहणार आहे.

तालुक्याची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुडाळमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. उपसभापती सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनलला सर्वाधिक सात जागा मिळाल्या आहेत. सरपंचपदासाठी हेच प्रमुख दावेदार असू शकतात. मात्र बहुमतासाठी त्यांना एका मताची गरज आहे. माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या चार जागा असून, हेमंत शिंदे व संजय शिंदे यांच्या कुडाळ बहुजन विकास आघाडीकडे चार जागा आहेत. राजकारणात आजचा शत्रू उद्याचा मित्र होऊ शकतो, राज्याच्या राजकारणावरून याची प्रचिती मिळाली आहे. यामुळे येथील सरपंच निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. यामुळे सरपंचपदासाठी येथे नेमकी काय खलबते घडणार, हे लवकरच स्पष्ट होईल. तसेच गावकारभारी ठरवण्यासाठी नेमकी कोणाची साथ कोणाला मिळणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: All eyes are on the selection of the Sarpanch of Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.